पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पद्मावती’ला बंदी

0

पुणे/पिंपरी-चिंचवड : पद्मावती चित्रपटात राणी पद्मावतीबद्दल झालेले चित्रीकरण पूर्णपणे चुकीचे आहे. सिनेमाच्या माध्यमातून विकृत स्वरुप दाखविले जात आहे. पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पद्मावती चित्रपट प्रदर्शित करू नका, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे पोलिस आयुक्त, दोन्ही महापालिकेच्या आयुक्तांना दिल्या आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटात पद्मिनी राणीचा अपमान केल्या असल्याचा आरोप करत, या चित्रपटाच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहरातील राजपूत समाज संघटनेने सोमवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढला. पालकमंत्री गिरीश बापट यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले. त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक
यावेळी मोर्चेकर्‍यांशी बोलताना गिरीश बापट म्हणाले, की पद्मावती चित्रपट सेन्सार बोर्डाने मान्य केला असला तरी, तो नागरिकांना मान्य नाही. ज्या बाबी नागरिकांना मान्य नाहीत त्या चित्रपटातून वगळण्यात याव्यात व नंतरच चित्रपट दाखवावा, असे पत्र मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आलेले आहे. सेन्सार बोर्ड वेगळे आहे. त्यामुळे सेन्सार बोर्डावर काही करता येत नाही. तसेच न्यायालयाने दुर्दैवाने त्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, असे ठरवले आहे. त्यामुळे यामध्ये सरकार हस्तक्षेप करेल आणि पद्मावतीसंदर्भात जे विकृत प्रदर्शन केले आहे. ते काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही बापट यांनी सांगितले. तसेच आंदोलकांसोबत मुंबईत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.