पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये छापे; अनेक सेक्स रॅकेट उद्ध्वस्त!

0

पुणे/पिंपरी-चिंचवड : पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये महाविद्यालयीन तरुणी पुरविण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट चालत असल्याची बाब दैनिक जनशक्तिने गतवर्षी आणि मागील काही दिवसांत विविध वृत्तमालिकेद्वारे चव्हाट्यावर आणली होती. त्याची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून, दोन्ही शहरातील सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी छापेसत्र सुरु केले आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने विविध ठिकाणी आठ कारवाया करुन 22 तरुणींची सुटका केली. शनिवारीही पिंपळे सौदागर येथील एका इमारतीत स्पाच्या नावाखाली चालणारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात थायलंड येथून आलेल्या युवती वेश्या व्यवसाय करत असून, त्यांना हाताळणारे दलालांचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क पुण्यात सक्रीय झालेले आहे. उच्चपदस्थ आणि श्रीमंतवर्ग या रॅकेटचे नियमित ग्राहक असून, त्याद्वारे कोट्यवधींची उलाढाल या व्यवसायात होत आहे.

थायलंडच्या प्रशिक्षित वेश्या पुण्यात!
पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेच्या पथकाने केलेल्या कारवायांत आतापर्यंत 22 तरुणींची सुटका करण्यात आली असून, त्यात पाच तरुणी या थायलंड येथील प्रशिक्षित वेश्या आहेत. तर अद्याप 13 जणांना अटक करण्यात आलेली आहे. मसाज पार्लर, स्पाच्या नावाखाली हे सेक्स रॅकेट कार्यरत आहे. थायलंड येथून टुरिस्ट व्हिसावर अनेक प्रशिक्षित वेश्या शहरात येत आहेत. पोलिसांच्या पथकाने आतापर्यंत कोरेगाव पार्क येथून 9 तरुणींची सुटका केली असून, 5 जणांना अटक केली होती. मुंढवातून दोन तरुणींची सुटका केली असून, दोघांना अटक केली होती. तर बाणेर येथे वेगवेगळ्या कारवायांत 5 थाई तरुणींची सुटका केली असून, तिघांना अटक केलेली आहे. भोसरीत दोन तरुणींची सुटका केली असून, एका महिलेला अटक केली होती.

थाई वेश्यांना एडस्, अनेक गुप्तरोग
दरम्यान, या धंद्यात सक्रीय असलेल्या दलालांनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, उजबेकिस्तान, थायलंड येथूनही काही वेश्या पुणे शहरात शरीरविक्रय करण्यासाठी आणल्या जात आहेत. थायलंडमध्ये वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता असून, वेश्यांना प्रशिक्षणही दिले जाते. तथापि, अनेक वेश्यांना एडस्, विविध गुप्तरोगदेखील असतात. त्यामुळे या वेश्यांमार्फत पुणेकरांना या रोगाची लागण होऊ शकते. अनेक वेश्या गर्भवती असल्याची बाबही त्यांच्या प्रेग्नन्सी टेस्टमध्ये दिसून आली आहे. त्यामुळे या थाई वेश्यांची मागणी करताना, पुणेकरांना काळजी घ्यावी लागणार आहे. टुरिस्ट व्हिसावर या वेश्या देशात आलेल्या आहेत.