पुणे : मध्य प्रदेश व राजस्थानकडून येणार्या उष्ण वार्यांमुळे राज्यातील तापमान पुन्हा वाढले असून, पुढील दोन दिवस मध्य व उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच, पुणे व पिंपरी- चिंचवड परिसरातील पारा शनिवारी पुन्हा 42 वर गेल्याने पुणे परिसरातही उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत.
मार्चच्या अखेरीस राज्यात बहुसंख्य ठिकाणी पारा 40 च्या पुढे गेला होता. त्यावेळी राजस्थानच्या परिसरात अँटी सायक्लोनिक परिस्थितीमुळे ही परिस्थिती उदभली होती. आताही तशीच काहीशी स्थिती असून, राजस्थान व मध्य प्रदेशाच्या भागातून राज्याकडे उष्ण वारे वागत आबेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, धुळे, मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूरसह मराठवाडा व विदर्भातील अनेक शहरांचे तापमान 43 अंशांवर गेले आहे. पुढील दोन दिवस ही स्थिती अशीच राहणार असून, उलट या भागातील तापमानात किंचित वाढच होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
पुणे परिसरात ढगाळ हवामान
पुणे परिसरात शनिवारी दुपारपासून अंशतः ढगाळ हवामान होते. त्यामुळे उकाडा वाढला. त्यातच पारा 42 अंशांपर्यंत गेल्याने अंगाची लाहीलाही होत होती. पुढील दोन दिवस हवामान असेच राहण्याचा अंदाज वेधशाळेतून वर्तवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातही तापमान वाढले आहे. विशेषतः जिल्ह्याच्या पूर्व भागातील इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर या तालुक्यात पारा 42 च्या पुढे गेल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. सकाळी नऊपासूनच उन्हाच्या तीव्र झळांनी परिसर भाजून निघतो आहे. त्यातच अनेक ठिकाणी वीज नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
महाबळेश्वरही तापले
राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचित असलेल्या महाबळेश्वरच्या परिसरातही पारा 35 अंशांवर गेल्याने उन्हाच्या झळा बसताहेत. त्यामुळे पाचगणी, महाबळेश्वरला भेट देणार्या पर्यटकांचाही हिरमोड होत आहे. सह्याद्रीच्या रांगेतील अन्य थंड हवेच्या ठिकाणीही असेच हवामान सध्या अनुभवास येत आहे.
पावसाला पूरक हवामान
राज्यात दरवर्षी एप्रिलमध्ये तापमान वाढतच असते. यंदाही तोच अनुभव येतो आहे. मात्र, अशी तापमानवाढ चांगल्या पावसास अनुकूल असते. त्यामुळे उत्तम पावसाळ्याचे संकेत हे हावमान देत आहे, असे कृषिहवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले.
अशी घ्या काळजी
– उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या काळात आवश्यकता असल्याच घराबाहेर पडा
– बाहेर पडताना डोके झाकून घेणे आवश्यक
– अतिथंड पाणी पिणे टाळावे
– दिवसभर ठराविक अंतराने पाणी पिणे गरजेचे