पुणे । आध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्रासंदर्भातील प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे का सोपवत नाही? मुळात पुणे पोलिसांकडे आर्थिक गुन्हे शाखा आहे का? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने केला असून याबाबत पुणे पोलीस आयुक्तांनी आठवड्याभरात उत्तर द्यावे, असे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्ते योगेश ठक्कर यांनी याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी उच्च न्यायालयात केली होती. खोटे मृत्यूपत्र बनवून ट्रस्टने कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोपही याचिकेत केला आहे.न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती बी.पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. याप्रकरणी 4 वर्षे उलटून गेली तरी पुणे पोलिसांना तपासात यश आलेले नाही. उच्च न्यायालयाला दिलेल्या माहीतीनुसार सध्या उपलब्ध असलेल्या मृत्यूपत्राच्या झेरॉक्सवरून त्याची सत्यता तपासण्यात असमर्थ असल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञांनी म्हटले आहे.
पुढील सुनावणी 23 जानेवारी रोजी
त्यामुळे परदेशात यासंदर्भात सुरू असलेल्या खटल्यातील मूळ कागदपत्रे आणि मृत्यूपत्राची प्रत मागविण्यासाठी केंद्र सरकारकडे पत्र-व्यवहार केल्याची माहीती देण्यात आली. मात्र अशा तपासासाठी 4 वर्षांचा कालावधी लागल्यामुळे, पुणे पोलिसांच्या ढिसाळपणावर उच्च न्यायालयाने यापुर्वीच तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जानेवारी रोजी आहे.
भक्तांतच संपत्तीसाठी वादावादी
रजनीश ओशो यांच्या मृत्यूनंतर तब्बल 23 वर्षांनंतर त्यांचे मृत्यूपत्र उघड करण्यात आले. त्यात नमूद केल्याप्रमाणे 1 हजार कोटींपेक्षा अधिक संपत्तीसाठी भक्तगणांतच वाद सुरू झाला आहे. विशेष म्हणजे 19 जानेवारी 1990 रोजी राजनीशांचे निधन झाले तेव्हा कोणत्याच ट्रस्टींनी त्यांच्या मृत्युपत्राचा उल्लेख केला नव्हता. मात्र आता अचानक 23 वर्षांनंतर युरोपियन युनियन न्यायालयासमोर हे मृत्युपत्र दाखल केले गेले आहे. भारतात असलेला दुसरा गट व ओशांचे लक्षावधी भाविक यामुळे हैराण आहेत. या मृत्यूपत्रावर ओशोंनी स्वतः 16 जून 1989 रोजी सही केली असून ट्रस्टच्याच दोन सदस्यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या आहेत. परदेशी भक्तांनी ओशोंनी सर्व संपत्ती नियो संन्यास इंटरनॅशनल फौंडेशनच्या नावाने केल्याचा दावा केला आहे.
ओशो फ्रेंडसचे मृत्यपत्राला आव्हान
दुसरीकडे ओशो फ्रेंडस फौंडेशनने या मृत्यपत्राला आव्हान दिले आहे, असे आव्हान दिले नाही तर सारी संपत्ती भारताबाहेर जाईल अशी भीती व्यक्त केली आहे. पुणे येथील ओशो ग्रंथालयात सुमारे 80 हजार पुस्तके आहेत. त्याचबरोबर 1870 तासांचे ओशोंचे व्हीडीओ, 65 भाषांतील पुस्तक प्रकाशनासाठीचे हक्क, 850 पेटींग्ज व कोरेगांव पार्क येथील आश्रमाची जागा अशी ही संपत्ती असून त्याची किंमत 1 हजार कोटीहून अधिक आहे. शिवाय ओशो फौंडेशन इंटरनॅशनल वर्षाला चार कोटी रूपयांची कमाई असल्याचे सुत्रांनी सांगितले. ओशो आश्रमाची जागा विकण्याचा प्रयत्न यापूर्वीही केला गेला आहे. 2001 सालात ही जागा गोदरेज प्रॉपर्टीला देण्यासंबंधी बोलणी सुरू होती व त्यातील काही जागा विकलीही गेल्याची चर्चा आहे.