पुणे । खंडाळा न्यायालयातून कारागृहात परत येताना तीन कैद्यांनी पुणे पोलिसांना कात्रजचा घाट दाखवला. पुणे पोलिसांच्या मुख्यालयातील कर्मचार्यांच्या हातावर तुरी देऊन तीन कैद्यांनी पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री कात्रज बोगद्याजवळ घडली. राजू महादेव पाथारे (वय 25, रा. चिंचवड), लोंढ्या उर्फ संतोष चिंतामण चांदीलकर (वय 25, रा. कवळे), संतोष मचिंद्र जगताप (वय 30, रा. मोरवाडी) अशी त्यांची नावे आहेत.
हे तीनही आरोपी पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात रॉबरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना एका गुन्ह्यात पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर खंडाळा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यांप्रकरणी खंडाळा न्यायालयात त्यांना सोमवारी हजर करण्यात आले. संजय संदनशिव, एस. व्ही. कोकरे, एस. के. खाडे व व्हि. ए. मांढरे असे चार कर्मचारी आरोपींना घेऊन गेले होते. न्यायालयाने त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करत त्यांना 21 एप्रिल रोजी परत हजर करण्याचे आदेश दिले. तेथून कारागृहात येत असताना संध्याकाळी 7.30 च्या सुमारास कात्रज जुन्या बोगद्याजवळ लघुशंका लागल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानुसार, कर्मचार्यांनी व्हॅन थांबवली. दरम्यान तिघांच्याही हातात बेड्या नव्हत्या. हीच संधी साधून आरोपींनी कर्मचार्यांना धक्का देऊन जंगलात पळ काढला. कर्मचार्यांनी त्यांचा पाठलाग केला. रात्री 11.30 वाजेपर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते मिळाले नाहीत. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांचे निलबंन
या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस उपायुक्तांनी चार पोलिसांचे निलंबन केले. संजय काशीनाथ चंदनशिव, एस. व्ही. कोकरे, एम. के. खाडे, व्ही. ए मांढरे अशी निलंबीत केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांची खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.