पुणे पोलीस दलाला चार पुरस्कार प्राप्त

0

जानेवारी ते मे 2018मधील कामगिरीचा गौरव; गुणात्मक अन्वेषणासाठी पुरस्कार

पुणे : पोलीस महासंचालकांकडून दर महिन्याला दिल्या जाणार्‍या पुरस्कारांमध्ये जानेवारी ते मे 2018 या कालावधीसाठी पुणे पोलीस दलाला चार पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला आहे़. गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न, सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत आणि सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी या गटात हे पुरस्कार जाहीर झाले आहेत़ यामध्ये मुंढवा पोलिसांनी बॅग पळवून नेणारी 19 जणांची टोळी जेरबंद केली होती़. वारजे-माळवाडी पोलिसांनी घरफोडीचे 12 गुन्हे उघडकीस आणून 21 लाखांची मालमत्ता हस्तगत केली होती. तर रविवार पेठेतील सराफी दुकानात दागिने लुटून नेणार्‍या नेपाळी टोळीला अटक केले होते.

अपंग मुलाचा खूनप्रकरणी ‘अपराधसिद्धी’ पुरस्कार

घरी येणार्‍या मित्राबरोबर राहताना अपंग मुलाची अडचण होत असल्याने आईने मित्राच्या मदतीने अपंग मुलाचा खून केला होता़ या 2016मध्ये झालेल्या गुन्ह्यात आईला न्यायालयाने शिक्षा सुनावली होती़ या कामगिरीबद्दल विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोतीचंद राठोड (10 हजार), पोलीस निरीक्षक संगीता पाटील (7 हजार), उपनिरीक्षक मच्छिंद्र गोरडे (4 हजार) आणि हवालदार कल्याण जगताप (4 हजाऱ) यांची सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

24 गुन्हे उघडकीस आले

मुंढवा पोलिसांनी खाजखुजली टाकून लोकांची नजर चुकवून त्यांची बॅग पळवून नेणारी 19 जणांची टोळी जेरबंद केली होती. त्यांच्याकडून पुणे, मुंबई, कल्याण, औरंगाबाद येथील 24 गुन्हे उघडकीस आले होते. मार्च 2018 मधील या कामगिरीबाबत गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न या गटात निवड करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर (5 हजार), उपनिरीक्षक ए़. जी.गवळी (3 हजार), हवालदार सुरेश सोनवणे (2 हजार) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

घरफोडीचे 12 गुन्हे उघडकीस

वारजे-माळवाडी पोलिसांनी घरफोडीचे 12 गुन्हे उघडकीस आणून 21 लाखांची मालमत्ता हस्तगत केली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक बी. एन.मोळे (5 हजाऱ), सहायक निरीक्षक बी. एस. शिंदे (5हजार), पोलीस नाईक ए़. एम. भोसले (3 हजार) आणि एस]. बी. पाटील (2 हजार) यांची सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.