पुणे फेस्टिव्हल : बॉक्सिंग स्पर्धेत ऋषीकेश ‘बेस्ट बॉक्सर’

0

पुणे । 29 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बॉक्सिंग स्पर्धेत मुलांच्या गटात ऋषीकेश बेस्ट बॉक्सर ठरला. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी पुढील वर्षी पुणे फेस्टिव्हलमध्ये राज्यस्तरीय मुले व मुलींच्या बॉक्सिंगच्या स्पर्धा घेण्याची घोषणा केली.

या स्पर्धेत पुणे शहर, जिल्हा आणि महाराष्ट्र पोलिस दलाच्या टीमसह एकूण 66 खेळाडू सहभागी झाले होते. पुणे फेस्टिव्हलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच खेळाडूंच्या कला गुणांना, कौशल्याला वाव मिळण्यासाठीच खास क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

पुढील वर्षी मुलीं व महिलांच्याही बॉक्सिंगच्या स्पर्धा पुणे फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. मुलींच्याही बॉक्सिंगच्या स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात पण यंदा गणेशोत्सवानंतर लगेचच मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धा होणार असल्याने खेळाडूंना दुखापत होऊ नये यासाठी यंदा फेस्टिव्हलमध्ये त्याचे आयोजन केलेले नाही, असे पुणे फेस्टिव्हल क्रिडा स्पर्धांचे समन्वयक प्रसन्न गोखले यांनी सांगितले. दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंची संख्या वाढत असून यंदाच्या स्पर्धेत बारामतीसह पुणे शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 10 क्लबचे खेळाडून सहभागी झाल्याची माहिती त्यांनी दिली.