पुणे मनपात सभा सुरु असतांना कोसळला लाकडी ठोकला; नगरसेवक बसले हेल्मेट घालून

0

पुणे-पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमधील सभागृहाच्या उद्धाटनप्रसंगी छत गळण्याची घटना घडली होती. यावरून बराच वाद निर्माण झाला होता. या घटनेला तीन महिन्याचा कालावधी झाल्यानंतर आज कामकाजाला सुरुवात झाली. मात्र यावेळी काही नगरसेवकांचे भाषण सुरू असताना अचानक वरून लाकडी ठोकळा पडल्याची घटना घडली. सभागृहात वरून काही वस्तू पडतील अशी भीती व्यक्त करत काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक योगेश ससाणे सभागृहात हेल्मेट घालून बसले.

सभागृहाचे काम नेमके कशा पद्धतीने करण्यात आले आहे असा प्रश्न निर्माण झाला.

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीचे 21 जून रोजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान सभागृहातील छत पावसाच्या पाण्याने गळत होते. त्यावरून पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर विरोधकांनी सभागृहाचे अर्धवट काम सुरू असताना आणि इमारतीमधील कोणत्याही मजल्यावर काम पूर्ण झाले नसताना एवढ्या लवकर उद्घाटनाची घाई का केली अशा शब्दात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेकडून सडकून टीका देखील करण्यात आली होती. त्यावरून सताधारी पक्षाकडून या सभागृहाच्या वादावर पडदा टाकण्याचे काम करीत लवकरच सभागृहाचे काम पूर्ण होईल आणि तेथून कामकाज सुरू होईल असे सांगण्यात आले.

त्यानंतर तब्बल 3 महिन्यानंतर आज पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकानी सभागृहात भगवे फेटे घालून प्रवेश केला. त्यानंतर सभागृहात भारतीय संविधानाचे वाचन उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी केले. त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक गोपाल चिंतल, आदित्य माळवे, अविनाश बागवे यांची भाषणं झाली. त्यानंतर वैशाली बनकर यांचे भाषण सुरू असताना मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या टेबल समोर अचानक वरून लाकडी ठोकळा पडण्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्व नगरसेवकांनी छताकडे पाहिले. त्यानंतर काही काळ नगरसेवकामध्ये चर्चा देखील झाली.