मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत शहरालगतच्या 34 गावांचा समावेश करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. आज, गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत आराखडा तसेच येणार्या समस्यांवर विस्तृत चर्चा झाली. तसेच गावांचा सामेव्श केल्यास यासाठी लागणार्या आर्थिक तरतुदीविषयी देखील चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2 जुलैपर्यंत हा निर्णय घेणे आवश्यक असल्याने या महिनाअखेरपर्यंत या गावांचा समावेश पुणे मनपात होण्याची शक्यता आहे. ही गावे पुणे महानगरपालिकेत समावेशित झाल्यानंतर पुणे ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरणार आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह पुण्यातील आमदार व मनपा अधिकारी तसेच नगरविकास विभागाचे उपस्थित होते.
राज्यातील सर्वात मोठे शहर होणार पुणे
राज्य सरकारने यासबंधी अध्यादेश यापूर्वीच जारी केला होता मात्र यानंतर गावसमावेश प्रक्रियेला स्थगिती दिली होती. या गावांच्या समावेशामुळे मनपाचे क्षेत्र दुपटीने वाढणार असून पुणे आता मुंबईहून मोठे होणार आहे. पुणे महापालिका हद्दीत 1997 मध्ये 23 गावे घेण्यात आली होती. त्यानंतर आता 20 वर्षांनंतर आणखी 34 गावांचा समावेश करण्यात येणार आहे. या गावांच्या समावेशामुळे पुणे राज्यातील सर्वात मोठी महापालिका होईल. नव्या गावांचा बोजा पेलताना महापालिकेला अधिकच कसरत करावी लागणार आहे. पुण्याचे सध्याचे क्षेत्रफळ 243 चौरस किलोमीटर आहे. पण आता 34 गावांचा समावेश झाल्यामुळे पुण्याचे क्षेत्रफळ सर्वसाधारण 456 चौरस किलोमीटर होणार आहे. या निर्णयामुळे गावांच्या विकासासाठी निधी उभा करण्याचा प्रश्न महापालिकेपुढे तातडीने उभा राहणार आहे. या गावांचा समावेश झाल्यानंतर जवळपास 6 लाखाच्या वर लोकसंख्या पुणे मनपात येणार आहे.
दीर्घकाळ चालले आंदोलन
काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना सरकारने 34 गावांच्या समावेशाची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे गावांच्या समावेश रखडला होता. यानंतर भाजप सरकारने देखील गावांच्या समावेशासाठी तातडीने कार्यवाही केली नव्हती. याउलट पालकमंत्री गिरीश बापट यांनी याला स्थागिती दिल्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली होती. 34 गावांचा महापालिकेत समावेश करावा यासाठी कृती समितीच्या वतीने व्यापक जनआंदोलने केली गेली आहेत. मोठा संघर्ष चालल्यानंतर उच्च न्यायालयाने 2 जुलैपर्यंत यावर निर्णय घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत ही गावे पुणे मनपात येतील अशी शक्यता आहे. शहरालगतच्या या गावांना प्रचंड लोकसंख्येचा, बांधकामाचा विळखा पडला आहे. कचरा, मैलपाणी, वाहतूक कोंडी, अपघात, पाणीटंचाई आदी समस्यांनी वेढलेल्या या गावांना बकालीकरण आले आहे. ही गावे पुणे मनपात समाविष्ठ झाल्यास गावांचा विकास होण्यास मदत होणार आहे.
या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर 34 गावांच्या समावेशाबद्दल विस्तृत चर्चा झाली. मात्र अद्याप अंतिम निर्णय दिलेला नाही. आम्ही ही मागणी लावून धरली आहे. मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक असून लवकरच या गावांचा समावेश होईल
- आ. संग्राम थोपटे
या गावांचा समावेश करणे हे निश्चित आहे. यासाठी टप्प्याटप्याने समावेश करण्यावर आज चर्चा झाली. तसेच यासाठीचे आर्थिक निकष, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा यांच्या समायोजन करण्यावर बैठकीत चर्चा झाली. न्यायालयाचे आदेश असल्याने या गावांचा समावेश करणे क्रमप्राप्त आहे. 2 जुलै च्या आधी यावर निर्णय होईल.
– गिरीश बापट
पालकमंत्री, पुणे