पुणे मनपा आरोग्य विभागातील घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

0

मुंबई:- पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 38 बाह्य रुग्ण व 19 रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करताना अनेक औषधे तसच मशीनरिंच्या खरेदीच्या बाबतीत झालेल्या घोटाळ्यावरून आमदार विजय काळे यांच्यासह विरोधी पक्षातील सदस्यांनी विधानसभेत मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. 7 वर्षांपासून आरोग्य प्रमुख व इतर महत्वाची पदे रिक्त असल्याने होत असलेल्या गैरसोईबद्दल लक्षवेधी उपस्थित करण्यात आली. यावेळी पुणे महानगरपालिकेतील मुख्य आरोग्य आधिकारी यांच्या पद भरतीची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. न्यायालयीन प्रकरणामुळे आरोग्य प्रमुखाचे पद भरणे शक्य झाले नव्हते. आता अडचण दुर झाल्याने पद भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये रिक्त पदे भरल्यानंतर आयसीयू तसेच एका महिन्याच्या आत कॅथलॅब सुरू करू असे आश्वासन त्यांनी दिले.

विजय काळे यांनी लक्षवेधी उपस्थित करताना औषध व मशिनरी घोटाळ्याची चौकशी करणार का? पुणे मनपाच्या आरोग्य विभागाचे ऑडिट राज्य सरकार करणार का? असे प्रश्न उपस्थित केले. यावर मुख्यमंत्र्यांनी घोटाळा उघडकीस आल्यानेच पुणे महानगरपालिकेतील औषध पुरवठादारांची नियुक्ती ई-निविदेद्वारे राबविण्यात येते. औषध पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराची निवड ही पारदर्शक पद्धतीने करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा चौकशी करण्याची गरज नाही असे ते म्हणाले. तसेच खरेदी करण्यात आलेल्या मशिनमध्ये संगणक, प्रिंटर, युपीएस, संगणक टेबल, नेट कनेक्शन यासह खरेदी किमतीत वार्षिक दुरुस्ती कंत्राटाचा समावेश आहे. तसेच खरेदी केलेल्या 5 मशिनपैकी एका मशिनमध्ये इलेस्टोग्राफी व इतर सॉफ्टवेअर इत्यादी सुविधा उपलब्ध असल्याने बाजार मुल्यापेक्षा सोनोग्राफी मशिनची किंमत जास्त आहे, असे त्यांनी सांगितले.

बच्चू कडू यांनी ससून रुग्णालयासह राज्यभरात अपंगांना प्रमाणपत्र मिळत नसल्याचे सांगत सर्व ठिकाणी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. यावर पात्र अपंगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावेत या सूचनेचा विचार करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. गरीबांना औषधे उपलब्ध होण्यासाठी केंद्रासोबतच्या योजनेनुसार राज्यभर जेनेरिक औषधांची दुकाने सुरु करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी मेधा कुलकर्णी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मेधा कुलकर्णी यांनी एमबीबीएस विद्यार्थ्यांना कचरा कंटेनर उचलावा लागत असल्याचे गंभीर बाब सभागृहासमोर आणली यावर ही बाब चुकीची गोष्ट असून यावर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.