पुणे । काँग्रेस घराणेशाहीचा पक्ष असल्याचा ढोल बडवणार्या भाजपमध्ये देखील घराणेशाहीची बीजे चांगलीच रुजली असल्याचे चित्र मंगळवारी महापालिकेत पाहायला मिळाले. स्थायी समिती सदस्यांच्या 8 रिक्त जागांवर नवीन सदस्यांची नियुक्ती मंगळवारी करण्यात आली. त्यातील 4 भाजपच्या जागांमधील 2 जागांवर पुण्यातील आमदारांच्या घरांतील लोकांना प्राधान्य देण्यात आले आहे. तर एका आमदारांचे बंधू स्थायी समितीमध्ये या पूर्वीच आहेत आणि पुण्याच्या खासदार पुत्राला तर पीएमपीएमएल संचालक पदाचे वरदान मिळाले आहे. तर काकडे गटाच्या पदरात एकही जागा पडली नाही. महापालिकेच्या कारभाराचा गाडा हाकणारी आणि तिजोरीच्या चाव्या हातात असणारी स्थायी समिती कधीही बरखास्त होत नाही. या समितीच्या आठ सदस्यांची दर दोन वर्षांनी मुदत संपते. तेवढेच सदस्य पुन्हा नव्याने निवडले जातात.
स्थायीच्या सदस्यांची एकूण सदस्यसंख्या 16 इतकी आहे. पालिका निवडणुकीनंतर अस्तित्वात येणार्या स्थायी समितीमधील आठ सदस्यांना केवळ एक वर्षाचा कालावधी मिळतो. त्यानुसार स्थायीमधील आठ सदस्य समितीमधून बाहेर पडले होते. त्यांच्या जागी 8 नव्या सदस्यांची नियुक्ती महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. या नियुक्ती करण्यापूर्वी काकडे गट आणि बापट गट मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले होते. मात्र काकडे गटाच्या पदरी यावेळी देखील निराशा आली आहे. तर दुसरीकडे पुण्यातील भाजप आमदार मात्र स्थायी समिती पद आपल्या घरात ओढून आणण्यात यशस्वी झाले आहेत. एका आमदाराने आपल्या आईसाठी तर दुसर्याने आपल्या भावांसाठी लावलेल्या सेटिंगला यश आले आहे. त्यामुळे घराणेशाहीच्या नावाने खडे फोडणारे भाजप या आपल्या घरातली घराणेशाही कशी रोखणार हे पाहावे लागेल.
भाजपात गटबाजी
स्थायी समितीतील आठ सदस्यांचा कार्यकाळ फेब्रुवारीत संपुष्टात आल्याने चिठ्ठी काढून या 8 सदस्यांची नावे काढण्यात आली. त्या 8 सदस्यांच्या जागी मंगळवारी 8 जणांची निवड पक्षातून करण्यात आली. दरम्यान, भाजपमधील अंतर्गत गटबाजी या निवडीमध्येही दिसून आली. काकडे गटाला धक्का देत आमदार कुटुंबीयांना सदस्यत्त्वाची संधी देण्यात आली आहे. रंजना टिळेकर या हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई आहेत तर योगेश मुळीक हे वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू आहेत. याशिवाय आधीच स्थायी समितीमध्ये सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे यांना संधी देण्यात आली आहेच. त्यामुळे आमदार कुटुंबीयांचे पारडे स्थायी समिती पद मिळवण्यासाठी जड झाले.
स्थायीचे नवीन सदस्य
मंगळवारी स्थायी समितीच्या नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये भाजपतून योगेश मुळीक, रंजना टिळेकर, उमेश गायकवाड, दिलीप वेडे-पाटील यांची काँग्रेसमधून वैशाली मराठे यांची, शिवसेनेतून संगीता ठोसर यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मी दुधाणे आणि स्मिता कोंढरे यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदासाठी चुरस
महापालिकेत सिनीयर असलेले सुनील कांबळे हे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेल्या आमदार जगदीश मुळीक यांनी बंधू योगेश मुळीक यांची वर्णी स्थायी समितीतील सदस्यत्त्वासाठी लावून घेतल्याने त्यामध्ये सरशी कोणाची होते, हे पाहणे अधिक उत्सुकतेचे ठरणार आहे.
इच्छुक सदस्य नाराज
आमदार पद आणि महापालिकेत मोस्ट वॉन्टेड असलेले स्थायी समितीपदही आमदारांच्याच घरी गेल्याने इच्छुक सदस्य नाराज झाले आहेत. इच्छुकांनी चिठ्ठी काढण्याआधीच पक्षातील वरिष्ठांच्या भेटीगाठी घेण्याला सुरुवात केली होती. मात्र काकडे गटाला संधी न देता आमदारांच्या कुटुंबीयांना संधी देण्याचे कारण काय, याविषयीची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. दरम्यान, सदस्य निवडीत भाजपने रिपाइंला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप आरपीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी केला आहे. स्थायी समितीमध्ये आम्ही एक जागा मागितली होती. मात्र निर्णय घेताना आम्हाला विचारलेदेखील नाही, असा आरोप कांबळे यांनी केला.