पुणे महापालिका शाळांमध्ये वंदे मातरम् सक्तीचे

0

प्रस्तावाला मुख्यसभेची मंजुरी

पुणे : भारतीयांच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणादायी ठरलेले राष्ट्रगान वंदे मातरम् आता पुणे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सक्तीचे केले जावे या प्रस्तावाला मुख्यसभेची मंजुरी मिळाली आहे. त्याचबरोबर या शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र बसविण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पाठोपाठ आता पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम् गायले जाणार आहे.

इस देश में रहना होगा, वंदे मातरम् कहना होगा
शिवसेना गटनेते संजय भोसले, नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे आणि विशाल धनवडे यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीला दिला होता. त्यानंतर हा प्रस्ताव पालिकेतील पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यसभेच्या मंजुरीला आला होता. मुख्यसभेत वंदे मातरम् म्हणणे सक्तीचे करण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोधाची भूमिका घेतली. हा विषय प्रत्येक शाळांना ऐच्छिक असावा, असे त्यांचे म्हणणे होते. या विरोधात भाजप-सेनेने घोषणाबाजी करण्याला सुरूवात केली. इस देश में रहना होगा, वंदे मातरम् कहना होगा अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. या प्रस्तावाला विरोध झाल्याने महापौरांनी नगरसचिवांना मतदान घेण्याचे आदेश दिले.

काँग्रेस, राष्ट्रवादीची तटस्थ भूमिका
काँग्रेस-राष्ट्रवादीचा शाळांत वंदे मातरम् म्हणणे सक्तीचे करण्याला विरोध होता. मात्र, शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र लावण्याला विरोध नव्हता. परंतु दोन्ही विषय एकाच प्रस्तावात असल्याने मतदान करताना काँग्रेस, राष्ट्रवादीने तटस्थतेची भूमिका घेतली. त्यामुळे हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.