पुणे महापालिकेचा करोडोंचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर

0

पुणे । पुणे महापालिकेचे 2017-18 या वर्षीचे अंदाजपत्रक गुरुवारी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे सादर केले. याआधी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रशासनाच्या वतीने 5 हजार 600 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले होते. त्यात नव्या योजनांचा समावेश करून 312 कोटींची वाढ करण्यात आली असून, एकूण 5 हजार 912 कोटींचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात आले.

अर्थसंकल्पातील विशेष तरतुदी
पाणीपुरवठा विभागासाठी महसुली तरतूद 352 कोटी 31 लाख, भांडवली कामासाठी 788 कोटी 57 लाख रुपयांची तरतूद.
केंद्र सरकारच्या माध्यमातून नदीसुधार प्रकल्प राबवला जाणार असून, यासाठी 990 कोटी रुपयांची तरतूद.
महापालिकेकडून 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
24 तास समान पाणी पुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या टाकणे, नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे या सर्व कामांसाठी 302 कोटींची तरतूद.
मिळकत कर विभागासाठी 1 हजार 333 कोटी 60 लाख रुपयांचे लक्ष्य ठेवले असून सर्व मिळकतीचे जीआयएस मॅपिंगद्वारे सर्वेक्षण. 1 हजार 718 कोटींची वसुली होण्याचा अंदाज.
बांधकाम परवानगी आणि विकास शुल्क विभागामार्फत 1 हजार 25 कोटी रुपयांच्या मिळकतीचे उद्दिष्ट. तसेच समुद्री जैवविविधता केंद्र उभारण्यासाठी 1 कोटींची तर, शिवसृष्टी प्रकल्पासाठी 10 कोटींची विशेष तरतूद.
गणेशोत्सव शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यामुळे या उत्सवासाठी 2 कोटी रुपयांची विशेष तरतूद
पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना कवच योजनेसाठी 10 कोटींची विशेष तरतूद. अपघात विमा 5 लाख रुपयांचा असून त्यामध्ये प्रामणिकपणे कर भरणा होणार आहे. यामधून महापालिकेचे उत्पन्न वाढेल आणि नागरिकांना विमा कवचही मिळणार.
प्रायोगिक रंगभूमीसाठी 1 कोटी
घनकचरा विभागामार्फत शहरातील कचरा संकलनासाठी 15 घंटागाड्या, कचरा वाहून नेण्यासाठी 200 गाड्या भाड्याने घेण्याचे नियोजन.
उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील कचरा डेपोमध्ये 750 टनाचा प्रकल्प उभारला जाणार आहे. मोशी आणि पिंपरी – सांडस येथील जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी आणि तेथील कामे करण्यासाठी 78 कोटी 45 लाख रुपयांची विशेष तरतूद.
मेट्रो प्रकल्पासाठी 50 कोटी, पुणे महापालिकेच्या सर्व शाळा ई – लर्निंग करण्यासाठी 6 कोटी, महापालिकेच्या दोन प्रसूतिगृहामध्ये नवजात अर्भक कक्ष विकसित करण्यासाठी 2 कोटी, आदीवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्यासाठी 1 कोटी.
महापालिकेच्या शाळांमधील विशेष नैपुण्य प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लोकमान्य टिळक गुणवत्ता पुरस्कार दिला जाणार असून त्यासाठी 50 लाख रुपयांची विशेष तरतूद.
भिडेवाडा दुरूस्ती आणि स्मारक उभारण्यासाठी 1 कोटी
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पातील 51 प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी 50 कोटी.