पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचा हृदयविकाराने मृत्यू

0

पुणे : पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सकाळी रेसकोर्सवर वॉकिंगला जात असताना आठच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना लगेच रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हॉस्पिटलबाहेर रिपाइंच्या कार्यकर्त्यांसह आंबेडकर चळवळीतील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांची गर्दी केली आहे.

नवनाथ कांबळे हे रिपाइंचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. दलित पँथरमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९९७ मध्ये ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. २००२ मध्येही त्यांनी नगरसेवकपद भुषविले. तसेच शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. रिपाइंचे शहराध्यक्षपदही त्यांनी काही काळ भुषविले होते.