पुणे : पुणे महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेने मंगळवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकत सभात्याग केला. त्यामुळे एकट्या सत्ताधारी भाजपने सर्वसाधारण सभा चालवल्याचे दृश्य पहायला मिळाले.
वसंत मोरेंनी ठणकावले, कात्रजचा घाट दाखवू!
सभागृहनेते भिमाले यांनी दिलेल्या एका मुलाखतीत विरोधकांनी विरोध केल्यास त्यांना बाहेरचा रस्ता दाखवू, असे वक्तव्य केले होते. त्यावर विरोधकांनी सर्वसाधारण सभेत जोरदार टीका केली. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. सभागृहात विरोधकांचा आवाज दाबला जातो, असे त्यांनी सांगितले. सभागृह नेत्यांनी असे वक्तव्य कोणत्या अधिकाराखाली केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी भिमाले यांना उद्देशून, तुम्ही काय आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवणार, आम्हीच तुम्हाला कात्रजचा घाट दाखवू, असे वक्तव्य केले. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य सभागृह नेत्यांकडून होणार असेल तर ते चुकीचे असल्याचे सांगितले. भाजपला उद्देशून ’आम्ही बहिष्कार टाकत आहोत ,तुम्हीच सभागृह चालवा’ असे सांगत विरोधकांनी सभात्याग केला.