पुणे महापालिकेत लवकरच राष्ट्रवादीची ‘सत्तावापसी’?

0

पुणे : पुणे शहराच्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये खासदार संजय काकडे यांना सहभागी करा; अन्यथा त्यांचे समर्थक असलेले 55 नगरसेवक स्वतंत्ररित्या निर्णय घेतील आणि आम्हाला हा निर्णय घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा इशारा देणारे निनावी पत्र सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना मिळाले आहे. या पत्रामुळे पुणे भाजपमध्ये उभी फूट पडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून, या लेटर बॉम्बने भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर येऊन पक्षातच अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, पक्षाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, खा. काकडे समर्थकांना सोबत घेऊन पुणे महापालिकेत पुन्हा ‘सत्तावापसी’ करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठस्तरीय नेत्यांमध्ये खलबते सुरु असून, त्यांच्या गळास खा. काकडेसमर्थक लागले आहेत. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाने खा. काकडे यांची दखल न घेतल्यास लवकरच पुणे महापालिकेत सत्ताबदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

नाराज गटावर राष्ट्रवादीचा डोळा!
सर्व नगरसेवकांना प्राप्त झालेले हे पत्र कुणी पाठवले, भाजपमधील गटबाजीतून ते आले किंवा विरोधी पक्षाने खोडासाळपणा केला. हे स्पष्ट झाले नसले तरी या पत्राने सत्ताधारी भाजप अडचणीत आला आहे. खा. संजय काकडे सोडून पुणे भाजपच्या सगळ्या नेत्यांवर म्हणजे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यापासून स्वीकृत नगरसेवक असलेल्या गोपाळ चिंतल यांच्यापर्यंतच्या सर्व नेत्यांवर या पत्रातून शेरेबाजी करण्यात आली आहे. खा. काकडे यांच्या प्रयत्नामुळेच पुणे महापालिकेत भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी काकडे यांना बहुमान असला तरी, स्थानिक पातळीवर महापालिकेत मात्र त्यांना काहीच मान नाही, याचे शल्य त्यांना टोचते आहे. त्यामुळे खा. काकडे यांच्यासह त्यांचे समर्थक 55 नगरसेवक नाराज आहेत. नाराजांचा हा गट आपल्याकडे वळवत महापालिकेत सत्तावापसी करता येते का, याचे नियोजन मात्र राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते करत असल्याचेही सूत्राने सांगितले. 35 खा. काकडेसमर्थक नगरसेवक आणि 39 राष्ट्रवादी व 9 काँग्रेस अशी बहुमताची गोळाबेरीज जुळवली जात आहे. शिवसेनाही 10 नगरसेवकांसह या आघाडीत येऊ शकते, असेही वरिष्ठ राजकीय नेत्याने दैनिक जनशक्तिशी बोलताना सांगितले.

‘बावळट’ वक्तव्यांवरुनही खा. काकडेंवर शेरेबाजी
समान पाणीपुरवठा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निविदा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर खासदार काकडे यांनी आमचे महापालिकेतील पदाधिकारी बावळट आहेत असे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद महापालिकेतील भाजप कारभार्‍यांमध्ये उमटले होते. स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आम्हाला कुणी शहाणपणा शिकवू नये असा टोला लगवला होता. एकूणच भाजपमधील सुप्त संघर्षाला तोंड फुटले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर शहरात काल ‘पुणेकर बंधू-भगिनींनो आमचा कोणताही पदाधिकारी बावळट नाहीये’ असे अज्ञातांनी फलक लावले होते. या पाट्यांच्या आडून भाजपमध्येच कुरघोडीच्या राजकारणाला सुरूवात झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे. रविवारी हे फलक लागले आणि सोमवारी पडलेल्या या लेटर बॉम्बने पुण्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

पक्षीय बलाबल
162 : एकूण जागा
81 : मॅजिक फिगर

97 : भाजप (-35 खा. काकडे समर्थक)
10 : शिवसेना
09 : काँग्रेस
39 : राष्ट्रवादी काँग्रेस
02 : मनसे
01 : एमआयएम
04 : अपक्ष

* 35 खा. काकडे समर्थक + 39 राष्ट्रवादी + 09 काँग्रेस = 83
* शिवसेनेने पाठिंबा दिल्यास 83 + 10 = 93