पुणे : पारदर्शी कारभाराचे स्वप्न दाखवून पुणे महापालिकेत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षावर महापालिकेत 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप झाला आहे. पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनीच भाजपला हा घरचा आहेर दिला. समान पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेने कर्जरोखे उभारले. मात्र प्रत्यक्षात काम करण्यासाठी मागवलेल्या टेंडरमध्ये चक्क 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या आरोपाला खा. काकडे यांनीही दुजोरा दिला आहे. या योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावर संशय व्यक्त करून थेट सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रार प्राप्त होताच सीबीआयनेही महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. दरम्यान, खा. काकडे यांनीही या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असल्याचीही माहिती हाती आली आहे.
टेंडर प्रक्रियेवर खा. काकडेंचा आक्षेप
समान पाणीपुरवठा योजनेचा पुणे महापालिकेतील सत्ताधार्यांकडून प्रचंड गाजावाजा करण्यात आला होता. या योजनेसाठी महापालिकेने कर्जरोखेही उभारले आहेत. मात्र प्रत्यक्ष काम करण्यासाठी मागवलेल्या निविदांमध्ये तब्बल 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. विशेष म्हणजे, याबाबत खा. संजय काकडे यांनीही तीव्र आक्षेप घेतलेला आहे. समान पाणी पुरवठ्यासाठी 1700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी कर्जरोख्यांद्वारे निधी उभारला जात आहे. पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्जरोखे काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कर्जरोख्यांची परतफेड पुणेकरांनाच करावी लागणार आहे. अशाप्रकारे कर्जरोखे काढून चोवीसतांस पाणी पुरवणारी ही पहिलीच महापालिका ठरली आहे.
1700 कोटींचा खर्च 2200 कोटींच्या घरात!
या योजनेच्या पूर्ततेसाठी आतापर्यंत एकूण चार टेंडर काढण्यात आले होते. त्यापैकी सर्व टेंडरची मिळून अंदाजपत्रकीय रक्कम 1700 कोटींच्या घरात जाते. चारही टेंडर हे साधारणपणे 27 टक्के चढ्यादरांनी आलेली आहेत. वाढीव दरांचा विचार करता योजनेचा अंदाजे खर्च 2200 कोटींच्या घरात जातो. एकूणच टेंडर प्रक्रियेत मोठी रिंग झाल्याची बाब स्पष्ट होत आहे. धक्कादायक बाब अशी, की चार टेंडर भरणार्या कंपन्या मात्र तीनच आहेत. चढ्यादराने टेंडर आलेले असतानाही ते मान्य करण्याची लगीनघाई महापालिकेत सुरु आहे. दरम्यान, या टेंडर प्रक्रियेबाबत संशय आल्याने त्याबाबत थेट सीबीआयकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार प्राप्त होताच सीबीआयने महापालिका आयुक्तांना पत्रही लिहिले आहे. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनीही या टेंडर प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेत, या प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजनेच्या टेंडर प्रक्रियेत झालेला 500 कोटींचा घोटाळा आता चव्हाट्यावर आलेला आहे.