पुणे महापौरांनी उधळली ‘मुक्ता‘फळे!

0

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चानंतर भाजप सरकार आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आरक्षणमुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे. नाशिकमध्ये चित्पावन ब्राह्मण संघातर्फे आयोजित परशुराम वेद पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

ब्राम्हण समाजातील मुले परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे आणि तेथेच स्थायिक होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. या कुशाग्र बुद्धिमत्तेला मायदेशी परत आणण्याची तसेच त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्याची गरज असून, त्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे वक्तव्य मुक्ता टिळक यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून मात्र राज्यात टीकेची राळ उठली आहे. यावेळी त्या म्हणाल्यात, ब्राम्हण समाज वेगवेगळ्या शाखांमध्ये विखुरला आहे. या समाजाने एक होणे ही काळाची गरज आहे. अंतर्गत भेद बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्रित यावे तसेच रोटी बेटी व्यवहार सुरू करावेत. तसेच, बुद्धिमत्तेच्या जोरावर नवनवीन संधी शोधल्यात आणि विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला कोकणातील चित्पावन ब्राम्हणही आता ग्लोबल झाल्याचे मुक्ता टिळक यांनी याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाला नाशिकच्या महापौर रंजना भानसी, संघाचे अध्यक्ष विजय साने, अभय खरे, श्रीरंग वैशंपायन, माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी, नगरसेविका दीपाली कुलकर्णी आदी उपस्थित होते.