पुणे : राज्यात शिवसेना,कॉंग्रेस-राष्ट्रवादी अशी महाशिवआघाडी सत्ता स्थापन करण्याबाबतची हालचाली सुरु आहे. हे झाले तर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील बदल होणार हे निश्चित. पुणे महानगरपालिका महापौर निवडणुकीत देखील महासेना आघाडी सक्रीय होण्याची चिन्हे आहे.निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने ‘महासेनाआघाडी’ने एन्ट्री केली आहे. भाजपकडून पुण्याच्या महापौरपदासाठी कोथरूडचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
आज सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यामुळे मुरलीधर मोहोळ भाजपच्यावतीने अर्ज दाखल केला. महापौरपदासाठी 22 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.
भाजपने उपमहापौर पदासाठी सरस्वती शेंडगे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने पुणे महापौर पदासाठी प्रकाश कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आज आपला अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत महासेनाआघाडी तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच भाजप नगरसेवकांचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचाही दावा राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केला आहे.