पुणे । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) पुणे ते महाबळेश्वर मार्गावरही वातानुकूलित शिवशाही बस सुरू केली आहे. 2 नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने शिवशाही बस या मार्गावर सोडण्यात येत असून सध्या तीन बस या मार्गावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या आधी सोडण्यात येणार्या हिरकणी या सेमी लक्झरी बसऐवजी शिवशाही ही वातानुकुलित बस सोडण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दिवसाला तीन बस
शिवशाही बसचे तिकीट दर 207 रुपये असून पुण्याच्या शिवाजीनगर एसटी स्थानकातून त्या सोडण्यात येतात. शिवाजीनगर येथून सकाळी 6.15, 7.45, 10 वाजता त्या सोडण्यात येत असून महाबळेश्वर येथून सकाळी 11.30, दुपारी 1 व 3 वाजता त्या सोडल्या जात आहेत. पुणे-सांगली, पुणे-कोल्हापूर मार्गावर शिवशाही बस काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. त्यानंतर पुणे ते नाशिक मार्गावर शिवनेरी व हिरकणी बंद करून शिवशाही सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे पुणे ते पणजी मार्गावर देखील शिवशाही सुरू करण्यात आली.
खासगी वाहतूकदारांना टक्कर
महाबळेश्वर येथे हजारोंच्या संख्येने दररोज पर्यटक येत असतात. यामुळे या मार्गावर एसटीने वातानुकुलित सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी कित्येक वर्षांपासून करत होते. या निमित्ताने ही मागणी पूर्ण झाल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, वातानुकूलित शिवशाहीचे तिकीट तुलनेने स्वस्त असून खासगी बसचालक याच प्रवासासाठी 350 ते 500 रुपये आकारतात. तसेच खासगी कॅब केल्यास अडीच ते चार हजारांपर्यंत भाडे आकारले जाते. शिवशाही सुरू केल्याने प्रवाशांना एक स्वस्त पर्याय उपलब्ध झाला असून खासगी वाहतूकदारांना यामुळे चांगली टक्कर मिळणार आहे.