पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक व उद्योगपती अविनाश भोसले यांच्यासह काँग्रेसनेते विश्वजित कदम यांच्या पुणेसह मुंबईतील घर व कार्यालयांसह तब्बल 25 ठिकाणी प्राप्तिकर खात्याच्या अधिकार्यांनी दोन दिवस छापे टाकल्याची माहिती हाती आली आहे. या छाप्यांत काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली असून, या दोघांच्या संपत्तीने अधिकारी चक्रावून गेले होते. या कारवाईत तब्बल 200 अधिकारी सहभागी झाले होते. भोसले यांच्या गणेशखिंड येथील एबिल ग्रुप या मुख्यालयासह बाणेर येथील घरी आणि कदम यांच्या सिंहगड येथील निवासस्थानाही प्राप्तिकर अधिकार्यांचे रात्री उशिरापर्यंत छापेसत्र सुरु होते. मात्र, हे छापे कशासाठी टाकण्यात आलेत, याबाबत मात्र कमालीचे मौन पाळण्यात आले.
काँग्रेस म्हणते हा सत्तेचा दुरुपयोग!
उद्योगपती व बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचे जावाई तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजिव विश्वजित यांच्या निवासस्थाने व कार्यालये यांच्यावर मुंबईतील प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्यांनी काल सकाळी सात वाजेपासून छापेसत्र अवलंबिले होते. रात्री उशिरापर्यंत शोध व तपास मोहीम जोरदार सुरु होती. मुंबई व पुणे येथील 25 ठिकाणी एकाचवेळी हे छापे टाकले गेले. त्यात 200 अधिकारी सहभागी झाले होते. छाप्याप्रसंगी भोसले व कदम यांच्या कर्मचार्यांचे मोबाईल फोन काढून घेण्यात आले होते. तसेच, खासगी सुरक्षा रक्षकही हटविण्यात आले होते. सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. भोसले यांचे मुख्यालय असलेल्या एबिल ग्रुप, गणेशखिंडसह बाणेर येथील निवासस्थान आणि इतर कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. या छापेसत्रामुळे काँग्रेसने मात्र संताप व्यक्त केला. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने हा सत्तेचा दुरुपयोग चालविला असून, काँग्रेसच्या बदनामीचे हे षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. विविध घोटाळ्यांत अडकलेल्या भाजप नेत्यांवर प्राप्तिकर खाते छापे का टाकत नाही, असा सवालही सावंत यांनी केला.
भोसलेंना यापूर्वीही झाली होती अटक
पुण्यात हॉटेल व बांधकाम व्यवसाय असलेल्या अविनाश भोसले यांना यापूर्वी दहा वर्षांपूर्वी रेव्ह्युन्यू इंटेलिजन्स खात्याच्यावतीने अटक करण्यात आली होती. एका संशयास्पद प्रकरणात मुंबई विमानतळावरून त्यांना अटक झाली होती. नंतर ते जामिनावर सुटले होते. त्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर आता पुन्हा ते प्राप्तिकर खात्याच्या रडारवर आले आहेत. दुसरीकडे, विश्वजित कदम हे भोसले यांचे जावाई असून, भारती विद्यापीठाचे सरकार्यवाह आहेत. शनिवारीही काही ठिकाणी छापेसत्र सुरुच होते, अशी माहितीही वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली. या छाप्यांत अनेक कागदपत्रे प्राप्तिकर खात्याने हस्तगत केली असल्याची माहितीही सूत्राने दिली.