सलग सुट्ट्यांचा परिणाम
पुणे-कोकणाकडे जाणारे वाहतूक कोंडीत अडकले
पुणे : शनिवारपासून चार दिवस सलग सुट्ट्या आल्यामुळे नागरिक बाहेर पडल्याने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे व मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या दोन्ही महामार्गांवर तब्बल पाच किलो मीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबई, पुणे आणि कोकणात चार दिवस मौजमजेसाठी निघालेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
दहा मिनिटांचे अंतरासाठी एक तास
28 एप्रिलला चौथा शनिवारची, 29 एप्रिलला रविवार तर 30 एप्रिलला बुद्धपौर्णिमा अशी सलग सुट्टी आहे. तसेच 1 मे रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी आल्याने लोक मोठ्या संख्येने खासगी वाहनांनी मुंबई, पुणे, महाबळेश्वर, कोल्हापूर परिसरातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यामुळे मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. सलग सुट्ट्यांच्या आनंद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. द्रूतगती महामार्गावर खोपोली घाट ते अंडा पॉईंटपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अगदी बोरघाटापर्यंत ही वाहतूक कोंडी पोहोचली होती. त्यामुळे दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी पर्यटकांना तासभर लागला होता.
महामार्ग पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न
दरम्यान, एक्स्प्रेस वेवर वाहनांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढल्याने अवजड वाहने जुन्या मार्गावरून वळवण्यात येत होती. पर्यटकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महामार्ग पोलिस शर्थीचे प्रयत्न करत होते. तर, मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी झाल्याने कोकणात जाणार्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. माणगाव येथे 5 किमी पर्यंत वाहतुकीच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी लवकर घरातून निघालेले अनेकजण रात्री उशीरापर्यंत इच्छितस्थळी पोहोचले नव्हते.