पुणे-मुंबई प्रवास 20 मिनिटांत !

0

पुणे । पुणे-मुंबई दरम्यानचे 145 किमीचे अंतर अवघ्या 25 मिनिटांत कापता येणार आहे. पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेल्स येथील हायपरलूप कंपनीबरोबर सामंजस्य करार केला. पुणे ते मुंबई हा प्रवास 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे. पुण्याहून मुंबई आणि नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास 20 मिनिटात शक्य होणार असून, त्यासाठी मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळासाठी हायपरलूप प्रवासी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. देशातील प्रमुख शहरे दोन तासात हायपरलूपने जोडली जाणार असून, त्याचा दरवर्षी 15 कोटी प्रवाशांना फायदा होणार आहे, असंही रिचर्ड ब्रॅन्सन म्हणाले आहेत.

पीएमआरडीएने केलेल्या सामंजस्य करारानुसार पुणे-मुंबई विभागातील मार्गांचे पूर्व व्यवहार्यता अभ्यास (प्री-फिजिबिलीटी स्टडी)अहवाल तयार करून हायपरलूप आधारित प्रवासी ट्रॅफिक सिस्टीम कार्यान्वित करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने तपासणी करून अहवाल तयार करण्यासाठी हा करार करण्यात आला. सध्या हायपरलूप आधारित ट्रांजिट प्रोजेक्टस नेदरलँडमध्ये, अबू धाबी ते दुबई आणि स्टॉकहोम ते हेलसिंकी येथे चालू आहे.

पहिला हायपरलूप मार्ग मध्य पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 फेब्रुवारीला नवी मुंबई विमानतळाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. हायपरलूप ट्रेनचा ताशी वेग एक हजार किमी असेल, अशी माहिती व्हर्जिन हायपरलूपचे रिचर्ड ब्रॅन्सन यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात बोलताना दिली.

दोन महिन्यांपूर्वी हायपरलूप वनच्या टीमने पुणे आणि मुंबईतील संभाव्य ठिकाणांची पाहणी केली होती. त्या वेळी, पुण्यात शिवाजीनगर परिसरामध्ये हायपरलूपचे स्टेशन करता येऊ शकते, या दृष्टीने चाचपणी करण्यात आली होती. तर, मुंबईला जाण्यासाठी तीन वेगवेगळ्या पर्यायी मार्गांची चाचपणी करण्यात आली होती.

हायपरलूप म्हणजे नेमके काय ?
दोन शहरांना जोडणार्‍या भव्य ट्यूब्स बांधल्या जातात. (एक मुंबईकडे जाणारी, तर पुण्याच्या दिशेने) ट्रेनप्रमाणे स्पेशल कम्पार्टमेंट एका दिशेने दुसरीकडे प्रवास करतात. हायपर लूप हा वाहतुकीचा नवीन प्रकार असून, कमी दाबाच्या निर्वात पोकळीमधून इलेक्टो-चुंबकीय प्रणोदकांमधून वाहतूक केली जाते. या प्रणालीद्वारे एका तासात 1 हजार 80 कि. मी. वेगानेही प्रवास करता येतो. हायपरलूप ही कार्यक्षम, सुरक्षित व विश्‍वासार्ह वाहतूक प्रणाली आहे.

पहिला टप्पा 2021 पर्यत होणार पूर्ण
’हायपरलूप वन’सोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार, व्यवहार्यता अहवाल तयार करून 10 किमीच्या ऑपरेशनल ट्रॅकची निर्मिती पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. हे काम 2021पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर, संपूर्ण मार्गाचे काम सुरू करता येणार आहे.
– किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए