पुणे- मुंबई रोडवरील पाटील इस्टेटमधील झोपडपट्टीला भीषण आग

0

६ ते ७ गॅस सिलेंडरचा स्फोट

पुणे : पुणे- मुंबई रोडवरील असणाऱ्या पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाकडून युद्धपातळीवर काम सुरु आहे़. प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत २०० पेक्षा जास्त झोपड्या या आगीत जळून खाक झाल्या आहे़त. त्यात ६ ते ७ गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याने आगीचा आणखी भडका उडाला आहे. दरम्यान गर्दीमुळे अग्निशामक दलाच्या जवानांना काम करणे अवघड होत आहे.

पाटील इस्टेट झोपडपट्टीतील गल्ली नंबर ३ मधील एका झोपडपट्टीला दुपारी एक वाजून १० मिनिटांनी आग लागली़. या आगीची खबर मिळताच अग्निशामक दलाच्या १० गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत़. आग मोठ्या प्रमाणावर पसरण्याचा धोका असून संपूर्ण परिसरात धूराचे मोठ मोठे लोट उठताना दिसत आहेत़. नदी काठा लगत असलेल्या या गल्लीपर्यंत पोहचण्यात अग्निशामक दलाला मोठे प्रयत्न करावे लागत आहेत़. स्थानिक तरुणांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व ही आग शेजारील झोपड्यांमध्ये पसरु नये, यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत़. आगीच्या ठिकाणी जाण्यासाठी अग्निशामन दलाच्या वाहनांना जागा मिळावी, यासाठी परिसरातील वाहतूक रोखण्यात आली आहे़.वाहतूक शाखेचे १५ कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी गर्दी रोखण्याचे काम करीत आहेत़.