पुणे : बारा डब्यांची पुणे- मुंबई लोकल गाडीचा प्रवास आता नजीकच आला असून चेन्नई येथील कारखान्यातून गाडी १० जानेवारीला दाखल होईल. लगेचच गाडीच्या चाचण्या सुरू होतील.
पुणे – मुंबई लोकल मार्गावर खंडाळा घाट हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि याकरिता रेल्वे गाडीत उच्च क्षमतेचे इंजिन आणि ब्रेक यंत्रणा वापरलेली आहे. आयटी क्षेत्रात गती घेणारे पुणे शहर आणि आर्थिक राजधानी मुंबई सध्या थेट लोकलने जोडलेली नाही. नोकरदारांसाठी हा प्रवास अनेक स्टेशन्स जोडणारा असल्याने सोयीचा ठरणार आहे. दोन्ही महानगरांलगतच्या गांवात राहाणाऱ्यांसाठी लोकलमुळे पुणे आणि मुंबई यांच्यातील दळणवळण सोपे होणार आहे.
हे देखील वाचा
रेल्वेचे निवृत्त अधिकारी वामनराव सांगळे यांनी २०१६ साली रेल्वे विकास शिबीरात ही सूचना केली आणि सत्तर पानांचा तांत्रिक अहवालही रेल्वेला सादर केला होता. सध्याच्या लोकल गाडयांची मार्गावर चाचणी घेतली तेव्हा जादा क्षमतेच्या ब्रेकींग यंत्रणेची गरज वाटली. त्यानुसार विशेष रेल्वे गाडी करण्याची ऑर्डर चेन्नई फॅक्टरीला देण्यात आली.
पुणे ते मुंबई रेल्वेचे अंतर १९२ कि मी. आहे. त्यातील पुणे ते लोणावळा ६४ कि.मी. आणि कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अंतर ९९ कि .मी. असे अंतर आहे आणि तिथे लोकल गाडी आहे .पण कर्जत ते लोणावळा या २८ कि. मी. अंतरात डोंगर आणि तीव्र चढउतार बोगदे असल्यामुळे या टप्प्यात लोकल धावत नाही. ही कमतरता भरून काढण्यासाठी जादा क्षमतेची लोकल गाडी तयार केली आणि ती मार्गावर लवकरच धावू लागेल.