पुणे । नागपूर मेट्रोच्या तुलनेत पुण्याच्या मेट्रोचे काम अधिक गतीने सुरू असून, भूमिपूजनानंतर अवघ्या 12 महिन्यात एका मार्गावर मेट्रोच्या सेगमेंटची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे. नागपूरमध्ये याच कामासाठी 22 महिने लागले होते. पुढील वर्षात मेट्रोच्या इतर मार्गांवरील कामांना गती दिली जाणार असून, निश्चित कालमर्यादेमध्ये सर्व काम पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) केला.
पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या प्राधान्य मार्गाचे काम वेगाने पुढे सरकत असून, या मार्गावरील खांब आणि सेगमेंट उभारणीचे 50 टक्के काम पूर्ण झाल्यावर तातडीने इलेक्ट्रिक आणि सिग्नल यंत्रणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे संकेत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिले. पुढील वर्षीच्या दुसर्या सहामाहीमध्ये प्राधान्य मार्गावर या कामांना सुरुवात केली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मे-जून 2019 पर्यंत प्राधान्य मार्गावरील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लवकरच भुयारी मार्गाचे काम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 24 डिसेंबरला मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर, गेल्या वर्षभरात महामेट्रोच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या विविध कामांचा आढावा दीक्षित यांनी घेतला. महामेट्रोकडे जबाबदारी दिली गेल्याने नागपूर मेट्रोसाठी काम करणार्या अनुभवी मनुष्यबळाचा उपयोग करून पुण्यात मेट्रोच्या विविध कामांना गती देण्यात आली. त्यामुळे, अवघ्या वर्षभरात प्रत्यक्ष दोन मार्गांवर काम सुरू झाले, असे त्यांनी सांगितले. मेट्रोच्या शिवाजीनगर धान्य गोदाम ते रामवाडी आणि रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गाच्या कामाच्या निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मार्च-एप्रिलपर्यंत या दोन्ही मार्गांवरही कामे सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
इमारतींचे सर्वेक्षण
शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान मेट्रोचा मार्ग भुयारी आहे. हा संपूर्ण परिसर जुन्या शहराचा असल्याने तेथे काम सुरू करण्यापूर्वी सर्व मिळकतींचे (जुने वाडे-इमारती) सर्वेक्षण आणि अभ्यास महामेट्रोने सुरू केला आहे. जुने वाडे-इमारतींचा पाया किती मजबूत आहे, याचा आढावा याद्वारे घेण्यात येणार असून, भुयारी मार्गाचे काम करताना या मिळकतींना धोका पोहोचू नये, याकडे लक्ष दिले जाणार आहे, असे दीक्षित यांनी नमूद केले.
समन्वय राखणार
मेट्रोचे काम करताना काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्याबद्दल आम्ही अत्यंत दिलगीर आहोत. विविध सरकारी यंत्रणांशी योग्य समन्वय राखून मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडीत फार काळ अडकून राहावे लागणार नाही, याची दक्षता निश्चित घेतली जाईल.
-ब्रिजेश दीक्षित,
व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो