पुणे मेट्रोचे काम 20 एप्रिलपर्यंत सुरु होणार

0

पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पाहिल्या टप्प्यातील पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून या प्रकल्पासाठी इच्छुक असणार्‍या कंपन्यांची निविदापूर्व बैठक 26 मार्चला पार पडली होती. यावेळी कंपन्यांनी निविदा प्रक्रियेच्या मुदतवाढीची मागणी केल्याने काही दिवसांची मुदत वाढ देण्यात आली होती. उद्या 10 एप्रिलला ती मुदत पूर्ण होत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला 20 एप्रिलपर्यंत मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.

कंपन्यांनी मागितली होती मुदत वाढ
पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गासाठी निविदा मागवण्यात आल्या असून निविदा दाखल करण्यासाठीची मुदत 31 मार्चला पूर्ण होत होती. मात्र या प्रकल्पासाठी इच्छुक असणार्‍या कंपन्यांनी मुदत वाढ मागितल्याने आता ती मुदत 10 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय महामेट्रोकडून घेण्यात आला होता. ती मुदत उद्या संपणार आहे.

10.75 किमीसाठी निविदा
पुणे मेट्रोचे काम महामेट्रोच्या अंतर्गत करण्यात येत आहे. हे काम तीन टप्प्यात करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गातील रेंजहिल्स या 10.75 किमी मार्गासाठी ही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. या मार्गात 7 मेट्रो स्टेशन येणार आहेत. पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्सपर्यंतच्या बहुतांश मार्गावर मेट्रोची उभारणी करताना ती जलद बस वाहतूक सेवेच्या (बीआरटीएस) स्वतंत्र मार्गिकेवरच केली जाणार आहे. त्यामुळे भूसंपादन किंवा इतर प्रक्रियेसाठीचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. रेंजहिल्सच्या पुढे स्वारगेटपर्यंतचा संपूर्ण मार्ग भुयारी असल्याने त्याचे काम नंतरच्या टप्प्यात केले जाणार आहे. त्यामुळे रेंजहिल्सपर्यंतचे 10.75 किमीचे काम करण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.

8 कंपन्या इच्छुक
या प्रकल्पासाठी टाटा प्रोजेक्ट, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, एनसीसी लिमिटेड, वालेंचा इंजिनिअरिंग लिमिटेड, आईटीपी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड या आठ कंपन्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी इच्छुक आहेत.