पिंपरी :- पुणे महामेट्रोचे ‘पुणे, पिंपरी चिंचवड महामेट्रो’ असे नामकरण करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या वर्षभरात पिंपरी ते शिवाजीनगर, स्वारगेटपर्यंत मेट्रो चालू होईल. या मेट्रोचे नामकरण ‘पुणे महामेट्रो’ असे करण्यात आले आहे. परंतु, पिंपरी चिंचवड शहरामधून शिवाजीनगर, स्वारगेट येथे मेट्रो जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहराने औद्योगिकरण, आयटी क्षेत्रात सर्वात वेगाने विकसित होणार्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातून जाणार्या मेट्रोचे पुणे महामेट्रो असे न करता ‘पुणे – पिंपरी चिंचवड महामेट्रो’ असे नामकरण करणे क्रमप्राप्त आहे. पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या आत्मसन्मानाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे मेट्रोचे ‘पुणे-पिंपरी चिंचवड महामेट्रो’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी मयुर कलाटे यांनी केली आहे.