पुणे मेट्रोचे 484 कोटींचे कंत्राट ‘एससीसी’च्या खिशात!

0

आठ मेट्रो स्टेशन्स उभारणार, 2019अखेर काम पूर्ण करणार

पुणे : बहुचर्चित पुणे महामेट्रोचे तब्बल 484 कोटी रुपयांचे कंत्राट हिंदूस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (एससीसी)ला मिळाले आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनच्या पुणे मेट्रो प्रकल्प दोनच्या या कामात एसलीली तब्बल आठ मेट्रो स्टेशन्स उभारणार आहे. त्यात वनाज, आनंदनगर, आयडिएल कॉलेनी, नळ स्टॉप, गरवारे कॉलेज, डेक्कन, संभाजी पार्क आणि पुणे महापालिका या स्थानकांचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्याच्या 14.66 किलोमीटर अंतराच्या या मार्गिकेवर एकूण 16 स्थानके राहणार असून, एससीसी आठ स्थानके उभारणार आहे. या स्थानकांच्या उभारणीमध्ये वास्तूरचना, बांधकामे आणि स्थानक इमारत यांचा समावेश असल्याची माहिती कंपनीच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. एसीसी ही बांधकाम क्षेत्रातील मोठी कंपनी असून, एल फरा या जागतिक दर्जाच्या कंपनीचे तिच्यात 51 टक्के भागभांडवल आहे.

पहिल्या टप्प्यातील 9 स्थानकेही बांधणार
दुसर्‍या टप्प्यातील काम 2019अखेर पूर्ण करायचे असल्याने महामेट्रोने या कामाला गती दिली आहे. त्यानुसार, वेगाने निर्णय प्रक्रिया राबविली जात आहे. पुणे मेट्रोचे काम घेण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील अनेक कंपन्या इच्छूक होत्या. परंतु, दर्जा, गुणवत्ता व अनुभव पाहाता 484 कोटींच्या या कामाचे कंत्राट एसीसी कंपनीला देण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. यापूर्वी टप्पा एकमधील नऊ स्थानकांच्या कामाचे बांधकाम आदेशही एससीसीला मिळालेले आहेत. तसेच, दुसर्‍या टप्प्यातील 16 पैकी आठ स्थानकांच्या बांधकामांचे कंत्राटही याच कंपनीला मिळालेले आहे. खरे तर हे काम कंपनीसाठी आव्हानात्मक असल्याची प्रतिक्रिया कंपनीचे सीईओ अरुण करमबेलकर यांनी दिली आहे. महामेट्रोचा दुसरा टप्पा हा 14.66 किलोमीटर अंतराचा आहे. त्यात वनाज ते पुणे महापालिका दरम्यानची स्थानके एसीसी बांधणार आहे. स्थानकांचे बांधकाम, त्यासाठीची दर्जेदार वास्तूरचना, व साईट डेव्हलपमेंटची कामेही याच कंत्राटाअंतर्गत पूर्ण केली जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत धावणार
पुणे महामेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार आहे, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास महापालिकेने महामेट्रो रेल कॉर्पोरेशनला सांगितले आहे. निगडीपर्यंतच्या मेट्रोचा खर्च पिंपरी महापालिका पेलणार आहे. मेट्रोनेदेखील पहिल्याच टप्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची तयारी दर्शविली आहे. याला मेट्रोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार आहे. महामेट्रोने दापोडी ते पिंपरी या 7.20 किलोमीटर अंतरादरम्यानचे काम वेगात सुरु केलेले आहे.

मुंबई मेट्रोतही अनेक कामांचे कंत्राट
एसीसी कंपनीने यापूर्वी मुंबई मेट्रोच्या कामात सहा स्थानके यापूर्वी बांधलेली आहेत. सद्या ही कंपनी मुंबई मेट्रोच्या टप्पा तीनमधील कामांत काही स्थानकेही बांधत आहे. तसेच, 3,115 मीटर लांबीचा दुहेरी बोगदा आणि चार भूअंतर्गत मेट्रो स्थानकेही कंपनी मुंबईत उभारत आहे. कंपनीच्या कामाचा दर्जा व वेळेत काम पूर्ण करण्याची क्षमता पाहूनच ही कामे कंपनीला देण्यात आल्याचे महामेट्रोच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने सांगितले. त्यामुळे 2019 अखेरपर्यंत टप्पा दोनचेही काम पूर्ण होईल, असा विश्वास पुणेकरांत निर्माण झालेला आहे.