पुणे मेट्रोच्या एनजीटीची अंतिम सुनावणी 5 डिसेंबरला

0

पुणे । पुणे मेट्रोचा मार्ग नदीपात्रामधून जात असल्याने या मार्गाला शहरातील पर्यावरणप्रेमींनी विरोध केला असून याच्या विरोधात एनजीटीमध्ये (राष्ट्रीय हरित न्यायालय) याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली या सुनावणीमध्ये पुणे मेट्रोला नेमलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल ‘एनजीटी’कडे सादर करण्याचे निर्देश देत याबाबतची अंतिम सुनावणी 5 डिसेंबरला होणार असल्याचे सांगितले.

मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांचा समावेश आहे. त्यांतील वनाझ ते रामवाडी या मार्गामध्ये बदल केला आहे. हा मार्ग जंगली महाराज, संचेती चौक, सिव्हिल कोर्ट, डॉ. आंबेडकर चौक मार्ग पुणे स्टेशनला जाण्याऐवजी खंडुजीबाबा चौक मार्गाने नदीपात्रातून पालिका भवन, धान्यगोदाम, संगम ब्रिजमार्गे पुणे स्टेशन असे जाणार आहे. त्यातील खंडुजीबाबा चौक ते सिव्हिल कोर्टपर्यंतच्या मार्गाला स्थगिती द्यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी ‘एनजीटी’मध्ये केली आहे.

या प्रकल्पाच्या विरोधात अनु आगा, दिलीप पाडगावकर, आरती किर्लोस्कर आणि सारंग यादवाडकर यांनी एनजीटीमध्ये याचिका दाखल केली. आजच्या सुनावणीमध्ये मागील सुनावणी दरम्यान ’एनजीटी’तर्फे महा मेट्रोच्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यासाठी तज्ञांची समिती नेमण्याची शिफारस केली होती. त्याचा अहवाल लवकरात लवकर ठेवण्याचे आदेश मेट्रोला देण्यात आले तसेच याचिका कर्त्यांकडून तज्ज्ञ समितीने अद्याप आपला अहवाल सादर केलेला नाही. या समितीत बदल करण्यात यावा अशी मागणी न्यायालयात करण्यात आली. महामेट्रोच्यावतीने उपस्थित राहून अ‍ॅड. प्रल्हाद परांजपे यांनी त्यास विरोध दर्शविला. त्यानंतर तज्ञ समितीने ‘एनजीटी’कडे आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश देत अंतिम सुनावणी 5 डिसेंबरला होणार असल्याचे सांगितले.