युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक, फ्रेंच डेव्हेलपमेंट बँकेच्या अधिकार्यांकडून पाहणी
पुणे : पुणे मेट्रोच्या अर्थपुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (इआयबी) व फ्रेंच डेव्हेलपमेंट बँकेच्या (एफडीबी) अधिकार्यांनी पुण्यातील प्रकल्पाची पाहणी करून समाधान व्यक्त केल्याची माहिती हाती आली आहे. महामेट्रोचे अधिकारी व या विदेशी बँकांच्या अधिकार्यांत कर्जप्रकरणावरून सुरु असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत, असेही सांगण्यात आले. या दोन्ही बँकांच्या पथकांना मेट्रो प्रकल्पाचा उभारणी खर्च, त्यासाठी लागणारा निधी व महामेट्रोद्वारे मिळणारे आर्थिक उत्पन्न याबाबत मेट्रो प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सविस्तर माहिती दिली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 11 हजार 420 कोटी युरोंचा खर्च अपेक्षित असून, पैकी इआयबी 600 दशलक्ष युरो (अंदाजे 4500 कोटी रुपये) तर एफडीबी 245 दशक्षल युरो (2000 कोटी रुपये) यांचा कर्जपुरवठा करणार आहे. तर राज्य व केंद्र सरकार एकूण खर्चाच्या 50 टक्के वाटा उचलणार आहे.
कर्ज मंजूर झाले की टेंडर प्रक्रिया!
ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले, की या दोन बँकांशी कर्ज पुरवठ्याबाबत सुरु असलेली चर्चा अगदी अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच कर्जपुरवठ्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा आहे. या बँकांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी बँकांकडे त्यांचा अहवाल सादर केला, की कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे महामेट्रोच्या कामांसाठी तातडीने पैसाही उपलब्ध होऊ शकले. महामेट्रोचे अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम यांनी सांगितले, की इआयबीकडून महामेट्रोला 4500 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केला जाणार आहे. तर एफडीबीकडून दोन हजार कोटी रुपये कर्जापोटी मिळू शकेल. या कर्जाची परतफेड दीर्घ मुदतीत करायची असल्याने त्याबाबत आताच काळजी करण्याची गरज नाही. केंद्र सरकार व राज्य सरकार या प्रकल्पात 50 टक्के वाटा उचलणार आहे. तर उर्वरित 50 टक्क्यांचा निधी या दोन विदेशी बँकांकडून कर्ज घेऊन उभा केला जाणार आहे, असेही सुब्रमण्यम यांनी सांगितले. एकदा कर्ज मंजूर झाले, की जमिनी खालील मेट्रो स्टेशन व मार्गिकांसाठी टेंडर काढले जातील. रेंज हिल्स ते स्वारगेट आणि शिवाजी नगर गोडावून ते रामवाडी या मार्गिका जमिनी खालून राहतील, असेही त्यांनी सांगितले.
आठवडाभरात स्टेशनचे काम सुरु होणार!
या दोन्ही बँकांचे वरिष्ठ अधिकारी बुधवारी व गुरुवारी पुण्यात होते. त्यांनी या कामाची पाहणीही केली. तसेच, महामेट्रोकडून संपूर्ण प्रकल्प व्यवस्थित समजून घेतला. सद्या मेट्रो प्रकल्पाची सुरु झालेली कामे, साईटस् यांच्या पाहणीनंतर त्यांनी प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत बैठकाही घेतल्यात. या कामासाठी काढावयच्या टेंडरची कागदपत्रेही अधिकार्यांना या बँकेच्या अधिकार्यांना सुपूर्त केली. सद्या महामेट्रोची पिंपरी-चिंचवड, रेंज हिल्स, वनाज आणि शिवाजीनगर गोडावून येथे कामे सुरु आहेत. ही कामेही बँकेच्या अधिकार्यांना दाखविण्यात आली. तसेच, मेट्रो स्टेशनसाठी नियोजित जागेचे कामही या आठवड्यात सुरु होईल, अशी माहितीही बँकेच्या अधिकार्यांना देण्यात आली. या दोन्ही बँकांकडून कर्जपुरवठा तातडीने झाला तर पुढील कामे वेगाने सुरु करता येईल, अशी अपेक्षाही या अधिकार्यांकडे व्यक्त करण्यात आली आहे.