पालकमंत्री गिरीष बापट यांनी जाहीर कार्यक्रमात नकार दिलेली
पिंपरी-चिंचवड : शहराच्या सुंदरतेसाठी, प्रदूषण रोखण्यासाठी, पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या कनेक्टीव्हीटीसाठी पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाणे हे आवश्यक आहे. यासाठी विविध संघटना लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. मात्र पुणे, पिंपरी-चिंचवडच्या कारभार्यांनीच या प्रकल्पाला खोडा घातल्यामुळे पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाणार की नाही याबाबत शंका आहे. नुकतेच विविध संघटनांनी उपोषण केले आहे, त्यावर भाजपाच्या आमदारांनी मेट्रो निगडीपर्यंत जाण्याचा शब्द दिला आहे. मात्र हा शब्द खरा ठऱणार का यावर शंका उपस्थित केली जात आहे.
पिंपरीऐवजी निगडीपर्यंतची मागणी
पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या निगडी आणि कात्रजच्या विस्तारामध्ये पुणे-पिंपरीचे कारभारी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीच खोडा घातला आहे. ‘आधी पिंपरीपर्यंतची मेट्रो धावू दे, मग निगडीच्या विस्ताराचे पाहू,’असे बापट यांनी सांगितले. त्यामुळे मेट्रोचा निगडी आणि कात्रजचा विस्तार पहिल्या टप्प्यात होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी असे दोन मार्ग विकसित केले जाणार आहेत. मात्र, पिंपरीचा मार्ग निगडीपर्यंत हवाच, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
विस्तार नंतर, पालकमंत्र्यांची भूमिका
पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी निगडीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) केल्या आहेत. तसेच, त्यासाठीचा निधी देण्याची तयारी पिंपरी चिंचवड महापालिकेने दाखवली होती. मात्र, पिंपरीतील पहिल्या मेट्रो स्टेशनच्या भूमिपूजन सोहळ्यात मेट्रोचा विस्तार सध्या शक्य नसल्याचे स्पष्टीकरण बापट यांनी दिले. डीपीआर तयार होऊन त्याला केंद्र-राज्याची मान्यता घेण्यात बराच कालावधी जातो. त्यामुळे, सध्या हे काम पूर्णत्त्वास जाऊ दे, त्यानंतर विस्ताराकडे पाहू, अशी टिप्पणी त्यांनी केली. त्यामुळे पुन्हा पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाण्यासाठी उपोषण करून फायदा होणार का यावर विचार होणे आवश्यक आहे.
महेश लांडगे यांचा मात्र शब्द
मेट्रो निगडीपर्यंत पहिल्या टप्प्यात घेऊन जाण्यासाठी पालकमंत्र्याचे लाडके आमदार महेश लांडगे यांनी शहरवासियांनी शब्द दिला आहे. त्यासाठी येत्या बजेटमध्ये मेट्रोसाठी चर्चा आणि नियोजन करू, तसेच पुणे मेट्रो निगडीपर्यंत जावी यासाठी शहरातील मोठ्या उद्योजकांकडून सीएसआर मधून निधी उभारू आणि हे काम पूर्णत्वास नेवू असे आमदारांनी सांगितले आहे. मात्र यापूर्वी पालकमंत्र्यांनी पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाण्यासाठी खोडा घातला होता. त्यामुळे आमदारांनी दिलेले आश्वासन खरे ठरणार का याबाबत नागरिकांना उत्सुकता लागली आहे.