‘आयआरएसडीसी’चा निर्णय : रेल्वे संचलन, तिकीट सोडून फ्लॅटफॉर्मची कामे, स्वच्छतागृह, कॅन्टिन, परिसरातील स्वच्छता कामांसाठी मदत
पुणे : पुणे रेल्वेस्थानकाचा विकास व देखभालीच्या कामांसोबतच प्रवासी सोयी-सुविधा पुरवण्याचे काम खासगी कंपनीकडून करण्याचा निर्णय इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कार्पोरेशनने (आयआरएसडीसी) घेतला आहे. त्यानुसार नव्या वर्षात पुणे रेल्वेस्थानकाचे ‘फॅसिलिटी मॅनेजमेंट’ खासगी कंपनीद्वारे करण्यात येणार आहे. दरम्यान, रेल्वे संचलन (ऑपरेटिंग), तिकिटांची कामे आणि सुरक्षाव्यवस्था सोडून इतर कामे ही कंपनी करणार असल्याची माहिती रेल्वे अधिकार्यांकडून देण्यात आली.
विभागीय रेल्वे मंडळाने रेल्वेच्या कामांची माहिती देण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील उपस्थित होते.
68 रेल्वेस्थानकांचा समावेश
रेल्वे मंत्रालयाच्या योजनेंतर्गत पुणे रेल्वे स्टेशनच्या विकासाचे काम लवकरच सुरू होणार असून याची जबाबदारी ‘आयआरएसडीसी’ सोपवण्यात आली आहे. मात्र, पुणे स्थानकाबाबतीत संस्थेने खासगी कंपनीची मदत घेतली असून या कंपनीकडून स्थानक परिसराची देखभाल केली जाणार आहे. देशभरातील काही रेल्वे स्थानक परिसरांचा विकास, देखभाल करून ती चकाचक करण्याची रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. यात देशातील महत्त्वाच्या 68 रेल्वेस्थानकांचा समावेश असून, टप्प्याटप्प्याने रेल्वेस्थानकांचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे स्टेशन आहे.
सर्व कामे बीव्हीजी कंपनीकडून
पुणे स्टेशनवरील फ्लॅटफॉर्मची कामे, स्वच्छतागृह, कॅन्टिन, परिसरातील स्वच्छतेसह सर्व कामे बीव्हीजी कंपनीकडून करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांसाठी त्यांना हे काम देण्यात आल्याचे अधिकार्यांकडून स्पष्ट करण्यात आले. कंपनीवर पुनर्विकासाची जबाबदारी असली तरी, रेल्वे संचलन आणि तिकीट यांमध्ये कंपनीचा हस्तक्षेप नसेल, असे पाटील यांनी सांगितले. प्लॅटफॉर्म तिकीट, पार्किंग शुल्काबाबतचे अधिकार कंपनीला आहेत. खासगी कंपनीकडून हे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
घोरपडीतील विहिरीचे पाणी वापरणार
पुणे स्थानकावर रोज ये-जा करणार्या रेल्वेगाड्यांची संख्या जास्त असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. या व्यतिरिक्त नागरिकांना पाणी पिण्यासाठी, कॅन्टिन, स्वच्छतागृहे यांच्या दैनंदिन वापरासाठीही पाणी लागते. पाण्याचा वापर जास्त असल्याने मागील काही दिवसांपासून रेल्वेला पाणी प्रश्न भेडसावत होता. यामुळे प्रशासन टॅकरच्या साह्याने विकत पाणी घेत होते. मात्र, घोरपडी परिसरात रेल्वेच्या हद्दीत मोठी विहीर असून, तिची पाणीक्षमता तब्बल 10 लाख लिटर आहे. येत्या पंधरा दिवसात रेल्वेस्थानकावर प्रत्यक्ष पाणी पोहचवले जाईल. लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी लागते. एका डब्यासाठी जवळपास दोन हजार लिटर पाण्याचा वापर होतो. यामुळे रेल्वेला अनेकदा विकत पाणी घ्यावे लागत होते. आता हा प्रश्न मार्गी लागल्याचेही देऊस्कर यांनी सांगितले.