पुणे रेल्वे मंडळ ऊर्जा बचतीसाठी अग्रेसर

0

पुणे । रेल्वे मंडळाने ऊर्जा बचत करण्यासाठी हात सरसावले असून मंडळातील सर्व स्थानकांवर एलईडी लाईट बसविण्यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वीज बचत होत आहे. सौर उर्जेवरील उपकरणे व सौर्ज ऊर्जा निर्मिती केंद्र यांच्या माध्यमातून पुणे रेल्वे मंडळाला मोठा फायदा होत आहे.याविषयी बोलताना मंडल रेल प्रबंधक मिलिंद देऊस्कर म्हणाले की, पुणे मंडळ ऊर्जा बचतीसाठी सातत्याने कार्यरत आहे. पारंपरिक दिव्यांच्या जागी एलईडी दिवे, सौर उर्जेवर चालणारे दिवे बसविण्यात आले आहेत. सीएसआर उपक्रमाअंतर्गत मेसर्स परसिस्टेंट फाउंडेशनद्वारे पुणे स्थानकावर 160 किलोवॅट तर दौंड स्थानकावर 10 किलोवॅट क्षमतेचे क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती केंद्र उभारण्यात आले आहेत.

वीजबचतीसाठी एनर्जी इफिशिएन्सी सर्विसेस लिमिटेड सोबत परफॉर्मन्स करार करण्यात आला आहे. या करारानुसार मंडळातील रेल्वे स्थानकावर व कार्यालयात लावण्यात आलेले जुने दिवे, पंखे व एसी नवीन स्टार रेटेड ऊर्जा उपकरांद्वारे जोडण्यात येणार आहेत. यामुळे सुमारे सात लाख 31 हजार युनिट ऊर्जेची बचत होणार आहे. त्यामुळे मंडळाचा 61 लाख 35 हजार रुपये खर्च वाचणार आहे. पुढील काळात पुणे रेल्वे मंडळात 1.2 एमडब्ल्यूपी क्षमतेचे सौर ऊर्जा संयंत्र लावण्यात येईल, त्यामुळे एक कोटी 47 लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे.