पुणे रेल्वे स्थानकातील फलाटांचा विस्तार

0

दोन कोटींची तरतूद; 26 डब्यांची गाडी थांबणार

पुणे : पुणे स्थानकातून दिवसाला सुमारे 280 रेल्वेगाड्या ये-जा करतात. त्यामध्ये स्थानकातून सुटणार्‍या किंवा पुणेमार्गे जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या मोठी आहे. रेल्वेगाड्या ये-जा करीत असल्याने स्थानकाच्या क्षमतेवर याचा ताण पडत आहे. तो कमी करण्यासाठी स्थानकातील सर्व फलाटांची लांबी वाढविण्यात येत असून, त्यासाठीच्या कामाला अर्थसंकल्पामधील दोन कोटी रुपयांच्या तरतुदीने गती मिळाली आहे.

हे काम पूर्ण झाल्यावर स्थानकाच्या प्रत्येक फलाटावर 26 डब्यांची गाडी थांबू शकेल.त्यातील अनेक गाड्या 25 डब्यांच्या आसपास असतात. स्थानकातील क्रमांक एकच्या फलाटावरच अशा गाड्या थांबविण्याची व्यवस्था आहे.इतर पाच फलाटांची क्षमता 12 ते 19 डब्यांची आहे. त्यापेक्षा जास्त डब्यांची गाडी स्थानकात थांबविण्यासाठी क्रमांक एकच्या फलाटावरच घ्यावी लागते. त्यामुळे वाहतुकीत अनेक अडचणी निर्माण होतात. त्या दूर करण्यासाठी स्थानकातील सर्व फलाटांचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. शिवाजीनगरच्या दिशेने फलाटांची लांबी वाढविण्यात येत आहे. त्यासाठी लोहमार्गाच्या रचनेतही बदल करावा लागणार आहे.

प्रवाशांच्या तुलनेत गाड्या कमी

प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत गाड्यांची संख्या कमी आहे. हे काम लवकर पूर्ण करून, जास्त डब्यांच्या गाड्या सोडल्या जाव्यात; तसेच फलाट क्रमांक आठ आणि नऊ प्रवासी गाड्यांसाठी खुले केले पाहिजे, असे याबाबत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले.