पुणे । पुणे-लोणावळा दरम्यानच्या चाकरमान्यांचा मोठा आधार म्हणून ओळखली जाणारी ईएमयू (इलेक्ट्रिक मोटर युनिट) लोकल चाळीशीत पदार्पण करीत आहे. 11 मार्च, 1978 साली सुरू झालेली लोकल भरधाव वेगाने प्रवाशांना सेवा देण्यात व्यग्र आहे. सुरुवातीला नऊ डब्यांची असणारी लोकल आज 12 डब्यांची झाली आहे. शनिवारी (दि. 11) लोकलच्या 40व्या वाढदिवसाच्या दिवशी रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक घेतला असून दिवसभरातील बहुतांश लोकल बंद ठेवण्यात आल्या आहेत. हा योगायोग प्रवासी, नागरिकांना हैराण करणारा ठरला आहे.
पुणे-लोणावळा मार्गावर नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवाशांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करीत रेल्वे प्रशासनाने पूर्वी नऊ डब्यांचीच असणारी लोकल 12 डब्यांची केली. पण प्रवाशांचा लोकल सेवेला प्रतिसाद पाहता, 12 डब्यांचीदेखील लोकल कमी पडू लागली. प्रवाशांनी लोकलचे डबे वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनदेखील रेल्वे प्रशासन मूग गिळून गप्प आहे. लोकलचे डबे वाढविण्याचा व लोकल गाड्यांमध्ये वाढ करून पुणे ते लोणावळा फेर्या वाढविण्याचा प्रस्ताव कित्येक महिन्यांपासून रेल्वे प्रशासन दरबारी धूळ खात पडलेला आहे. सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत लोकलमध्ये पाय ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी असते.
पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत सेवा
पुणे रेल्वे स्थानकावरून 4.45 वाजता पहिली पुणे-लोणावळा लोकल सुटते. तर लोणावळा स्थानकावरून पहिली लोकल 05.20 वाजता सुटते. दिवसभर दोन्ही बाजूंनी मिळून तब्बल 44 फे-या केल्या जात आहेत. रात्री पुणे स्थानकावरून शेवटची लोकल 12.10 वाजता सुटते. तर लोणावळा स्थानकावरून रात्री 11.40 वाजता सुटते. त्यामुळे पहाटे सुरू झालेली लोकल मध्यरात्रीपर्यंत सेवा देत असल्याने पुणे-लोणावळा मार्गावरील प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.
रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण
प्रवाशांना लोकलची सेवा योग्य पद्धतीने मिळण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. काही रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण करून प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे. प्लॅटफॉर्मची लांबी वाढल्यानंतर लोकलच्या डब्यांची देखील संख्या वाढवता येणार आहे, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. लोकलला विलंब होत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आल्याने प्रत्येक किलोमीटरवर सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. चाळीशीत पोहोचलेल्या लोकलकडून प्रवाशांच्या अपेक्षा उंचावत आहेत. तसेच लोकलदेखील प्रवाशांकडून लोकल गाडी स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करीत आहे.