पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगचा पेपर फुटल्याची अफवा

0

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचा पेपर फुटला नसून पेपर फुटल्याची अफवा काही जणांनी पसरवल्याचे आता समोर आले आहे. पुण्यातल्या एमआयटी कॉलेजमध्ये बुधवारी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचा पेपर फुटल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली होती.

विद्यापीठानेही तातडीने या घटनेची दखल घेत परीक्षा समिती कॉलेजमध्ये पाठवली होती. या समितीने बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी केली. पोलिसात ही तक्रार देण्याचे काम सुरू होते. मात्र, परीक्षा समितीच्या चौकशीअंती पेपर फुटलाच नसल्याचे आता समोर आले आहे. यासंदर्भात काही जणांनी खोडसाळपणा केल्याची शक्यता समितीला वाटत आहे. दरम्यान या संदर्भात एमआयटी महाविद्यालयाकडून हलगर्जीपणा झालाय का याबाबत ही तपासणी केली जाणार आहे.

बुधवारी सकाळी १० वाजता हा पेपर होता. हा पेपर सुरू झाल्यानंतर मोबाईलवर या पेपरचे फोटो आले असून ते व्हायरल झाल्याची अफवा पसरली. पेपरफुटीच्या नावाखाली विद्यापीठाच्या परीक्षा समितीला ज्या प्रश्नपत्रिका पाठवण्यात आल्या त्या जुन्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सर्व अफवा पसरवण्यामागे कोण आहे, याचा छडा लावण्यासाठी गरज पडल्यास पोलिसांची मदत ही घेतली जाणार आहे.