पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नितीन करमाळकर

0

पुणे : ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुपदी डॉ. नितीन करमाळकर यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव यांनी याबाबतची घोषणा बुधवारी दुपारी केली. करमाळकर हे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख होते.

डॉ. करमाळकर हे गेल्या 25 वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत आहेत. भूगर्भशास्त्र आणि भूरसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणशास्त्र विभागप्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला होता. विद्यापीठाच्या अनेक समितींवर त्यांनी काम केले आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत कुलगुरुपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. कुलगुरुपदासाठी एकूण 90 अर्ज आले होते. त्यांच्या छाननीनंतर एकूण 36 उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात आली. त्यानंतर कुलगुरूपदासाठी निवड झालेल्या अंतिम पाचजणांच्या मुलाखती राव यांनी मंगळवारी घेतल्या. यात डॉ. नितीन करमाळकर यांच्यासह प्रा. एम. राजीवलोचन, प्रा. भूषण पटवर्धन, प्रा. अंजली क्षीरसागर यांचा समावेश होता. विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. वासूदेव गाडे यांचा कार्यकाळ 15 मे रोजी समाप्त झाला होता. त्यामुळे त्यांच्या जागी आता डॉ. नितीन करमाळकर हे कार्यभार सांभाळणार आहेत. प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे नव्या कुलगुरूंना आज गुरूवारी (18 मे) कार्यभार देणार आहेत.

करमाळवर यांचा परिचय
करमाळकर यांचा जन्म 11 जानेवारी 1962 मध्ये झाला. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून जीओलॉजी मधून बी.एसी.ची पदवी घेतली आहे. त्याचबरोबर 1983-84 मध्ये सर परशूराम महाविद्यालयातून जिओलॉजी विभागातून एमएससी पूर्ण करून 1988 मध्ये जीओलॉजी विभागात शोधप्रबंध सादर करून त्यांना पी.एचडी. मिळाली. करमाळकर यांची भूगर्भशास्त्र व भूरसायनशास्त्र यावर पुस्तके सुद्धा प्रकाशित झाली आहेत.

विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
विद्यापीठाची कुलगुरूपदी निवड झाल्याचा खूप आनंद होत आहे. माझ्या कारर्किदीत विद्यापीठाचा विकास व प्रगती करण्यासाठी मी प्रयत्नशील असेन. विद्यापीठाला अधिक वरचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. त्याचबरोबर सध्या विद्यार्थ्यांच्या नोकरीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल.

डॉ. नितीन करमाळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ