पुणे । विविध विद्याशाखांचे शिक्षण देणार्या देशभरातील दोन हजारांहून अधिक उच्चशिक्षण संस्थांचे यंदाच्या वर्षाचे एनआयआरए रँकिग केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केले होते. या मानांकनांमध्ये सर्व संस्थांच्या सामायिक रॅकिंगच्या पहिल्या 10 संस्थांमध्ये आयआयटी, मुंबईने तिसरे तर विद्यापीठांच्या पहिल्या 10 रॅकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नववे स्थान मिळविले. पुणे विद्यापीठ वगळता राज्यातील एकाही पांरपरिक विद्यापीठाला या यादीत स्थान मिळालेले नाही. याच कार्यक्रमात नऊ वर्गांमध्ये सर्वोच्च रँकिंग मिळविलेल्या 69 संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
2,809 संस्थांही सहभाग घेतला
उच्च शिक्षण संस्थांना नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फे्रमवर्क (एनआयआरएफ) रॅकिंग देण्याचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. यंदा या रँकिंगमध्ये एकूण 2,809 संस्थांही सहभाग घेतला. सहभागी झालेल्या सर्व संस्थांना सामायिकपणे जी पहिली 10 मानांकने दिली गेली त्यात मुंबई आयआयटीचा तिसरा तर सावित्राबाई फुले विद्यापीठाचा 16 वा क्रमांक लागला. सर्वोत्कृष्ट विद्यापीठे व महाविद्यालयांच्या रँकिंगमध्ये राज्यात अनुक्रमे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन महाविद्यालय अव्वल ठरले आहे. तर देशपातळीवर सर्व संस्थांमध्ये पुणे विद्यापीठाने मागील वर्षीच्या तुलनेत दोन क्रमांकांनी तर विद्यापीठांमध्ये एका क्रमांकाने प्रगती केली आहे. विद्यापीठांमध्ये राज्यातील पहिला क्रमांक पुणे विद्यापीठाने यंदाही कायम राखला. राज्यातील इतर पारंपरिक विद्यापीठे 100 ते 200 क्रमांकामध्ये आहेत.