पुणे:- विद्यापीठ अनुदान आयोग तसेच शासनाच्या निर्देशानुसार पदवी आणि पदव्युत्तरचे अंतिम वर्ष वगळता अन्य वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे.
निकालाच्या बाबतीत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत अंतिम वगळता इतर वर्षांचे निकाल महाविद्यालय स्तरावर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आता महाविद्यालय स्तरावर या संदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
परीक्षा होणार नसलेल्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन, निकाल तयार करण्याची प्रक्रिया महाविद्यालय स्तरावर पूर्ण करण्यात येईल. नंतर महाविद्यालये विद्यापीठाकडे पाठवतील. त्यानंतर विद्यापीठाकडून निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.