पुणे। पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेचा (नॅक) ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. द्वितीय मूल्यांकन प्रक्रियेत महाविद्यालयाला ‘अ’ दर्जा मिळाला आहे. नॅकद्वारे केलेल्या मूल्यांकनात चार गुणांपैकी महाविद्यालयाला 3.12 गुण मिळाले. महाविद्यालयांच्या द्वितीय मूल्यांकन सत्रात नॅकच्या नवीन मूल्यांकन पद्धतीनुसार ‘अ’ दर्जा मिळवलेले हे राज्यातील पहिलेच अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. प्राचार्य डॉ. योगेश नेरकर, नॅक समन्वयक प्रा. डॉ. कल्याणी कुलकर्णी यांनी विद्यार्थी, पालक व संस्थाचालकांचे आभार मानले.
याबद्दल कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, कुलसचिव सुनील रेडेकर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक प्रा. राजेंद्र कडुस्कर यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे. आगामी काळात महाविद्यालय गुणवत्ता वाढीची ही परंपरा कायम ठेवेल व यापुढे संशोधनावर अधिक भर दिला जाईल, असा विश्वास कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे यांनी व्यक्त केला.