पुणे विभागातील पोलिस पाटील व कोतवालांची रिक्त पदे डिसेंबर अखेर भरणार

0

विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची माहिती; भरतीसाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी

पुणे । प्रशासनाच्या बळकटीकरणासाठी गाव पातळीवर महत्त्वाची भूमीका बजावणार्‍या पोलिस पाटील व कोतवालांची अनेक पदे पुणे विभागात रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंतचा कालबध्द कार्यक्रम आखण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी बुधवारी (दि.8) पत्रकार परिषदेत दिली. जनता व प्रशासन यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटील काम करतात. गावातील गुन्ह्यांची माहिती पोलिस स्टेशनला देतात, आरोपीला वारंट बजावण्यासाठी पोलिसांना मदत करतात, गावातील गुन्हे रोखण्यात त्यांची महत्वाची भूमीका असते. कोतवाल गाव पातळीवर तलाठ्यांना मदत करतात. गावातील घराघरातील माहिती त्यांना असते, असे दळवी यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात 1,165 पदे रिक्त
पुणे विभागात पोलिस पाटील पदांच्या एकूण 6,361 मंजूर पदांपैकी 3,737 पदे रिक्त आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 1,769 मंजूर पदांपैकी 1,165, सातारा जिल्ह्यातील 1,671 मंजूर पदापैकी 1,150, सांगली जिल्ह्यातील 722 मंजूर पदांपैकी 215, सोलापूर जिल्ह्यात 1080 मंजूर पदापैकी 949 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 1,119 मंजूर पदांपैकी 258 पदे रिक्त आहेत.

कोतवालाची 782 पदे रिक्त
पुणे विभागात 2,917 कोतवाल पदांपैकी 782 पदे रिक्त आहेत. पुणे जिल्ह्यात 588 मंजूर पदापैकी 90, सातारा जिल्ह्यात 548 मंजूर पदांपैकी 117, सांगली जिल्ह्यात 789 मंजूर पदापैकी 455, सोलापूर जिल्ह्यात 535 मंजूर पदापैकी 55 पदे आणि कोल्हापूर जिल्ह्यात 457 मंजूर पदापैकी 65 पदे रिक्त आहेत.

प्रशासनाचा ताण कमी करणार
पोलीस पाटील व कोतवालांच्या रिक्त पदांची संख्या पुणे विभागात अधिक आहे. प्रशासनाचा ताण कमी होण्यासाठी ही पदे भरणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत या पदभरतीचा कालबध्द कार्यक्रम पुणे विभगात आखण्यात आला आहे. त्या बाबतच्या सूचना संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानंतर तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे.

अर्ज करण्याचे आवाहन
पोलिस पाटलांची नेमणूक उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत करण्यात येते. पोलिस पाटलांचे मानधन 3 हजार रुपये आहे. या पदासाठी सदर उमेदवार त्या गावचा रहिवासी असला पाहिजे, त्याची शैक्षणिक अर्हता दहावी उत्तीर्ण असावी तसेच त्याची शाररिक क्षमता चांगली असणे आवश्यक आहे. कोतवालाची नेमणूक तहसिलदारांमार्फत करण्यात येते. कोतवाल पदाचे मानधन 5 हजार रुपये आहे. या पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही सर्व पदे आरक्षणाच्या रोस्टर प्रमाणे भरण्यात येणार असून या पदासाठी सक्षम उमेदवार मिळण्यासाठी अधिकाधिक जणांनी या भरती प्रक्रीयेत अर्ज करण्याचे आवाहन दळवी यांनी केले आहे.