पुणे विभागामध्ये सर्वाधिक अपघात

0

‘ब्लॅक स्पॉट’ची 22 ठिकाणे

पुणे : अपघातप्रवण ठिकाणांच्या (ब्लॅक स्पॉट) सर्वेक्षणामध्ये शहरात 22 ठिकाणे ब्लॅक स्पॉट म्हणून निश्‍चित करण्यात आली. सातत्याने अपघात होणार्‍या या ठिकाणांवर पुन्हा अपघात होऊ नयेत, यासाठी दुरुस्ती व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत पोलिस प्रशासन व प्रादेशिक परिवहन विभागाने संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेल्या आदेशानुसार, केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी परिवहन विभागाचे मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांनी एका महिन्यात दोनदा विविध विभागांची एकत्रित बैठक घेतली.

त्यामध्ये पुणे विभागामध्ये सर्वाधिक अपघात झाल्याने, भविष्यात असे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर पोलिसांनी दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करणे, कारचालकांना सीटबेल्ट वापरणे याबाबत कारवाई सुरू केल्याचे स्पष्ट केले. याबरोबरच शहरात सातत्याने होणार्‍या अपघात ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट) पाहणी करून तेथेही अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अन्य विभागांशी पोलिस प्रशासन व प्रादेशिक परिवहन विभागाने पत्रव्यवहार केला आहे.

पोलिस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभागासह विविध विभागांची गुरुवारीही एकत्रित व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. या परिषदेनंतर संबंधित सर्व विभागांची बैठक होऊन त्यामध्ये रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने एक समन्वय व्हॉटसअप ग्रुप करण्याचे ठरले आहे. या ग्रुपवर तात्पुरत्या स्वरूपात 15 जानेवारीपर्यंत उपाययोजना करण्याबाबतचा निर्णय झाला.