पुणे विमानतळावर दोन प्रवाशांकडे आढळली काडतुसे !

0

पुणे – पुणे विमानतळावर आज पहाटे ४.४५ वाजेच्या सुमारास एकाचवेळी दोन प्रवाशांकडे काडतुसे आढळल्याने एकच खळबळ उडाली. विमान प्रवासात रिव्हॉल्व्हर अथवा काडतुसे घेऊन जाण्यास मनाई आहे. असे असताना प्रवाशांच्या सामानात काडतुसे आढळल्याने या प्रवाशांना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुण्याहून स्पाईस जेट एअरवेजच्या विमानाने पाटील आडनाव असलेले प्रवासी बंगळुरूला जात होते. त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली जात असताना त्यांच्या बॅगेत २२ काडतुसे आढळून आली. त्यांच्या सामानात केवळ काडतुसे असून रिव्हॉल्व्हर नव्हते.

दुसरे प्रवासी भगवान चरणसिंह हे पुण्याहून दिल्लीला जाणार होते. त्यांच्याही सामानात त्याच दरम्यान २ काडतुसे आढळून आली. त्यांनाही विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. भगवान चरणसिंह हे रेल्वेत एक्सप्रेसचे चालक आहेत. त्यांचा मुलगा वाघोली येथील आयटी पार्कमध्ये नोकरीला आहे. त्यांच्या सामानात काडतुसे आढळल्याने ते एकदम घाबरुन गेले असून ही काडतुसे कशी आली हे त्यांना सांगता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले.