पुणे शहरात टप्याटप्याने सर्व व्यवहार सुरू होणार

0

पुणे : लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात अर्थात अनलॉक एकमध्ये पुणे शहरात तीन टप्प्यात हळूहळू व्यवहार सुरू करण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार उद्याने, मैदाने, टॅक्सी, कॅब, रिक्षा, बाजारपेठा, मंडई, खासगी कार्यालये ८ जून पर्यंत टप्प्याटप्पाने सुरू करण्यात येणार आहेत.

प्रतिबंधित क्षेत्र वगळून शहराच्या अन्य भागात या सवलती सुरू राहणार आहे. आज बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

३ जून, ५ जून आणि ८ जून असे शिथलीकरणाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. करोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या नियमांचे आणि अटींचे पालन करण्याची सूचना नागरिकांना देण्यात आली आहे.

३ जूनपासून घराबाहेरील व्यायाम- सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे आदी वैयक्तिक व्यायामप्रकार खासगी, सार्वजनिक मैदानात करण्यास मुभा देण्यात आली आहे. महापालिके ची सर्व उद्याने, मैदाने, संस्था- सोसायट्यांची मैदाने, उद्यानांचा त्यासाठी वापर करता येणार आहे. क्रीडांगणाच्या बंदिस्त भागात व्यायामप्रकार करण्यास मनाई आहे. सामुदायिक स्वरूपात उद्यानांचा वापर करण्यास मनाई आहे.

५ पासून बाजारपेठा- मॉल, व्यापारी संकुल वगळता अन्य व्यापारी क्षेत्रे, तुळशीबाग, हाँगकाँग लेन या सारखी ठिकाणे आणि रस्त्यावरील दुकाने आळीपाळीने सुरू राहणार आहेत. मुख्य रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम दिनांकाच्या दिवशी आणि दुसऱ्या बाजूची दुकाने विषम दिनांका दिवशी उघडतील. वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ राहणार आहे.
टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकींमध्ये वाहनचालक आणि केवळ दोन प्रवासीच प्रवास करू शकतील. दुचाकीवर एकाच व्यक्तीला प्रवास करता येईल.

८ जूनपासून खासगी कार्यालये १० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू करता येतील.

शहरातील यापूर्वीच्या ६५ प्रतिबंधित क्षेत्रातून २७ क्षेत्रे वगळण्यात आली असून २८ क्षेत्रांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.