पुणे शहरात प्लास्टिक बंदीची धडक कारवाई; व्यापाऱ्यांकडून विरोध

0

पुणे – राज्य शासनाने आजपासून संबंध राज्यात प्लास्टिक बंदी जाहीर केली आहे. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर पुणे शहरात धडक कारवाई करण्यात येत असून पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात प्लास्टिक बंदीची सक्ती केली आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयामार्फत प्लास्टिक बंदीची कारवाई सकाळीपासून सुरू झाली आहे. प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाची १७ पथके स्थापन करण्यात आली असून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

२५ हजारापर्यंत दंड
महापालिकेची ही पथके आपापल्या परिसरातील क्षेत्रीय कार्यालयात येणारे बाजार, लहान मोठी दुकाने, आठवडेबाजार, सुपर मार्केट इत्यादी ठिकाणी कारवाई करीत आहेत. कारवाई करतांना प्लास्टिकच्या पिशव्यांसह थर्माकॉल, प्लास्टिकपासून तयार केलेले ताट, कप, चमचे, भांडी, हॉटेलमध्ये वापरण्यात येत असलेल्या वस्तूंची तपासणी केली जाते आहे. प्लास्टिकच्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने एक महिन्याची मुदत देऊन जनजागृती केली होती. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर आणि विक्रेत्यावर ५ हजार ते २५ हजारांच्या पटीत दंड करण्यात येत आहे. यावर व्यापारांचा संतापही दिसून येत आहे. प्लास्टिक बंदीचा निर्णय चांगला असला तरी सरसकट प्लास्टिक बंदी करू नये असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. प्लास्टिक बंदीची कारवाई करत असाल तर प्लास्टिकला कोणती पर्यायी व्यवस्था केली ? असा सवाल व्यापारी विचारत आहेत.

सरसकट प्लास्टिक बंदीमुळे अनेक लहान रोजगारांवर परिणाम होणार आहेत. पुणे शहरात लोणचे, पापड, चटण्या आणि मसाले विक्री करणारे अनेक लहान व्यवसायिक आहेत. त्यांची व्यवस्था करण्याची मागणी व्यापारी करत आहेत. महापालिकेने प्लास्टिक रिसायकलिंगची कोणती व्यवस्था केली असेही विचारले जात आहे. अनेक देशात प्लास्टिक रिसायकलिंगची चांगली व्यवस्था आहे, मग आपल्याकडे का नाही हे व्यापारी विचारत आहेत. काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवण्यासाठी आपली दुकानेही बंद ठेवली आहेत.