पुणे शहराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीला नव्या चेहर्‍याचा शोध

0

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी फेसबुकवर लाईव्ह येत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांची उत्तरे दिली. एका तरुणाने पुणे शहरात दीपक मानकर यांना संधी द्यावी, असे सुचवले होते. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, पुण्यासाठी पाच- सात नावे आहेत, त्यावर विचार करून मी निर्णय देणार आहे. पण हे पाच-सात नावे कोणाची आहेत यावर त्यांनी भाष्य केले नाही. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी अजित पवार हे नवीन चेहर्याच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे. तसेच, मानकरांना संधी मिळण्याची शक्यताही धुसर झाली आहे.

9, 10 जून रोजी पुण्यात निवड
पुण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीवेळीच शहराध्यक्षांचे नावदेखील जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले होते. तो मुहूर्त हुकल्यानंतर पक्षाला हवा असलेल्या चेहर्‍याचा शोध सुरूच आहे. सध्या अध्यक्षपदासाठी उत्सूक असलेल्यांपैकी माजी महापौर प्रशांत जगताप, माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी सभागृह नेते सुभाष जगताप हे आघाडीवर आहेत. दरम्यान 9 आणि 10 जून रोजी पुण्यात होणार्‍या बैठकीत शहराध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुकीची रणनीती : अजित पवार
मागील वर्षी झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर या पराभवाची जबाबदारी स्वीकारत खासदार वंदना चव्हाण यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा सोपवला होता. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी चव्हाण यांनाच कायम ठेवले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नवीन शहराध्यक्ष देण्याची मागणी होत आहे. आता राज्यभरातील पक्ष संघटनेत बदल केले जात असताना शहराध्यक्ष पदासाठी पुन्हा एकदा नवीन चेहर्‍याचा शोध घेतला जात आहे.