शिक्रापूर । पुणे-शिरूर रस्त्याच्या 462 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. डिसेंबर अखेर त्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली.
पुणे-शिरूर रस्त्यावरील वाघोली, कोरेगाव-भीमा, शिक्रापूर, सणसवाडी येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. याशिवाय रांजणगाव, कारेगाव, शिक्रापूर, कोंढापुरी, सणसवाडी, कोरेगाव-भीमा येथील औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतुकीमुळे या रस्त्यावरील ताण वाढला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा रस्ता कुठल्या योजनेतून करायचा यावर चर्चा सुरू होती. मागील वर्षी हायब्रीड अॅन्युईटीमधून हा रस्ता करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. तर, केंंद्राने केंद्रीय रस्ते निधीतून रस्ता करण्याची घोषणा केली. केंद्राच्या योजनेतून हा रस्ता लवकर सुरू होण्याची शक्यता नाही. त्यातच या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे. याकडे पाचर्णे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेऊन हा रस्ता केंद्रीय रस्ता निधी योजनेऐवजी हायब्रीड अॅन्युईटी प्रकल्पांतर्गत घेण्यास मान्यता दिली. त्यामुळे हा 55 किलोमीटरचा रस्ता हायब्रीड अॅन्युईटी प्रकल्पांतर्गत आणि त्या पुढील नागपूरपर्यंतचा रस्ता केंद्रीय रस्ता निधीतून करण्याचे यावेळी निश्चित झाल्याचे पाचर्णे यांनी सांगितले. या रस्त्यावरील वाघोली, कोरेगाव भीमा व शिक्रापूर येथील उड्डाणपुलांच्या कामाची निविदा प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. हा रस्ता सहापदरी करण्यात येणार असून डिसेंबर अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होणार असल्याचे पाचर्णे यांनी सांगितले.