पुणे-सातारा महामार्गावर केमिकलच्या ट्रकला आग

0

भोर । पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून सातारच्या दिशेने केमिकल घेऊन निघालेल्या मालवाहू ट्रकने मंगळवारी अचानक पेट घेतला. या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. आग इतकी मोठी होती की ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाला अडीच तास लागले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुणे-सातारा मार्गावरील वरवे येथे सकाळी 8 च्या सुमारास ही घटना घडली. सकाळी हा ट्रक वरवे गावच्या हद्दीतून जात असताना ट्रकच्या मागच्या बाजूला आग लागल्याचे वाहन चालक सुलतान सय्यद याच्या लक्षात येताच प्रसंगावधान ओळखून त्याने ट्रक रस्त्याचा बाजूला घेतला. चालक आणी क्लीनर दोघेही ट्रकमधून खाली उतरले होते. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडीत रसायन असल्याने आगीने अधिक पेट घेतला. ही माहिती पुण्याच्या अग्निशामक दलाला दिल्यावर आगीचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणली.

वाहतुकीचा खोळंबा
ट्रक आणि त्यातील रसायनाने पेट घेतल्याने आगीचे लोट आणि धुरांचे तांडव महामार्गावर पसरले होते. यामुळे दोन्ही बाजूकडे जाणार्‍या मार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहनाच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. मात्र, महामार्ग वाहतूक पोलिस आणि राजगड ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वेळीच वाहतूक कोंडी सुरळीत करून गर्दी हटवली.