पुणे-सातारा रस्त्याच्या कामामुळे अपघात

0

खेड शिवापूर: पुणे-सातारा महामार्गावर पडलेले खड्डे, उखडलेली खडी, उभे केलेले बॅरल यांमुळे दुचाकीस्वार पडून जखमी झाले असून याबाबत स्थानिकांसह प्रवासी त्रस्त झाला आहे. पुणे-सातारा रस्ता रुंदीचे काम सुरू असून काही ठिकाणी सेवा रस्त्याचे कामही सुरू आहे. शिंदेवाडी ते खेड शिवापूर टोल नाक्यापर्यंत सध्या हे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. या दरम्यान ससेवाडी फाटा येथे भुयारी मार्गाचे काम सुरू असून, या दरम्यानची वाहतूक सेवा रस्त्याने वळवण्यात आली आहे.

सातार्‍याकडे जाताना हा मार्ग उताराचा असून या मार्गावरील रस्ता उखडून खडी रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे दुचाकीस्वार या ठिकाणी घसरून पडत असून, जखमी होत आहेत. खेड शिवापूर बाग वस्तीत कोंढणपूर फाटा येथे उड्डाणपुलावरून जाण्यासाठी मुख्य मार्ग व सेवा रस्ता यामध्ये मोठा उंचवटा असल्यानेही दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. या दरम्यान बॅरल उभे करण्यात आले आहेत. मात्र, धोक्याचे फलक लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत. रविवारी (दि. 30) रात्री एकच्या सुमारास येथे उभ्या केलेल्या बॅरलला धडकल्याने दुचाकीचे तर नुकसान झाले; पण दुचाकीस्वार जखमी झाला असून, येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या रस्त्याची दुरुस्ती त्वरीत व्हावी, तसेच येथे धोक्याचे फलक लावण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांसह स्थानिकांकडून होत आहे.